MPSC Exam Postponed Date 2025: राज्यातील काही भागांत पावसाने विध्वंस घडवला. अनेक ठिकाणी गावांना पुराने वेढा दिला. अनेक गावांचा संपर्क तुटला. अनेक तरुण परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. तशी शिफारस राज्य सरकारने केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २८ सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. आता नोव्हेंबर महिन्यात ही परीक्षा घेतली जाणार आहे.
राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. याची दखल घेत राज्य सरकारने तशी शिफारस आयोगाला केली.
एमपीएससी परीक्षा, मुख्यमंत्री काय म्हणाले?
याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्यात विविध भागात झालेला पाऊस, पूरस्थिती आणि येत्या 2-3 दिवसांत आणखी पावसाचा हवामान खात्याचा इशारा पाहता, येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती करणारे एक पत्र राज्य सरकारने एमपीएससीला पाठविले आहे. त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन आयोगाने दिले आहे. राज्यातील विविध भागातील परीक्षार्थींनी अशाप्रकारची मागणी आमच्याकडे केली होती."
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेच्या तारखेची केली घोषणा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयोगाने म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गांवाचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.
सदर निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येईल. परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे ९ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची सुधारित तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
Web Summary : Due to severe flooding, the MPSC exam scheduled for September 28th has been postponed to November 9th. The state government recommended the delay to ensure all candidates can participate, considering disrupted connectivity and weather warnings.
Web Summary : भारी बाढ़ के कारण, 28 सितंबर को होने वाली एमपीएससी परीक्षा 9 नवंबर तक स्थगित कर दी गई है। राज्य सरकार ने कनेक्टिविटी बाधित होने और मौसम की चेतावनी को देखते हुए सभी उम्मीदवारों की भागीदारी सुनिश्चित करने के लिए देरी की सिफारिश की।