Presidential Election 2022: “शरद पवार ग्रेट लीडर, राजकारण न आणता द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करावा”
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 15:40 IST2022-07-14T15:39:43+5:302022-07-14T15:40:08+5:30
Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू यांच्याकडे भाजपचा उमेदवार म्हणून पाहू नये. आपण सगळे आदिवासी समजाच्या पाठिशी आहोत, हा विश्वास देणे गरजेचे आहे, असे अपक्ष खासदारांनी म्हटले आहे.

Presidential Election 2022: “शरद पवार ग्रेट लीडर, राजकारण न आणता द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करावा”
मुंबई: राज्यात एकीकडे सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना दुसरीकडे देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential election 2022) रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेरीस एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. काहीच दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची उमेदवारी का नाकारली, याबाबत खरे कारण सांगितले होते.
भाजप सोडून देशातील सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रपतीपदासाठी आग्रह केला होता. पण माझे व्यक्तिगत मत स्पष्ट होते की, ही जबाबदारी किंवा हे काम स्वीकारू नये. यात यश येण्याची स्थिती नव्हती. यदाकदाचित यश आले असते तर माझ्यासारख्या माणसाला अखंड एका ठिकाणी बसणे, कुठेही बाहेर न जाणे, लोकांशी सुसंवाद न ठेवणे या सगळ्या गोष्टी त्रासदायक झाल्या असत्या. त्यासाठी हा आपला रस्ता नाही हा विचार असल्याने मी नाही म्हणून सांगितले, असे शरद यांनी स्पष्ट केले. यानंतर आता अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी शरद पवार यांना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली आहे.
आदिवासी समाजाला सर्वांच्या समर्थनाची गरज
शरद पवार महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यांच्याकडूनच सर्वांना राजकीय प्रेरणा मिळत असते. आदिवासी समाजाला सर्वांच्या समर्थनाची गरज आहे. जमिनीवर काम करून अतिशय संघर्ष करून एक महिला इतक्या उंचीवर जाऊन पोहोचलेली आहे. मात्र, यात राजकारण आणू नये. द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केवळ भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला एक उमेदवार म्हणून पाहू नये. त्या कोणत्या समाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आणि काय परिस्थितीत त्या संघर्ष करून येथपर्यंत पोहोचल्या. आपण सगळे आदिवासी समजाच्या पाठिशी आहोत, हा विश्वास देण्यासाठी शरद पवार यांना विनंती आहे की, आपले जेवढे आमदार, खासदार आहेत, त्यांचे समर्थन दिल्यास एक नवा विश्वास निर्माण होईल, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेना कोत्या मनाची नाही. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे आमच्या पक्षातील आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांनी एका आदिवासी उमेदवाराला देशाचे राष्ट्रपतीपद भूषवण्याची संधी मिळत असल्यामुळे आपण पाठिंबा द्यायला हवा अशी विनंती माझ्याकडे केली. शिवसेनेने याआधीही पक्षीय अभिनिवेशन बाजून ठेवून प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.