मुंबई : गणरायाला निरोप देताना शनिवारी लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वारासमोर एका अनोळखी वाहन चालकाने दोन भावंडांना धडक देऊन पळ काढला. या अपघातात दोन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला, तर तिचा ११ वर्षांचा भाऊ गंभीर जखमी झाला. दुसरी दुर्घटना साकीनाका भागात घडली. विसर्जन मिरवणुकीत गणेशमूर्तीच्या ट्रॉलीत वीजप्रवाह उतरून बसलेल्या धक्क्यात एकाचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. तिसरी दुर्घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील भारंगी नदीवर विसर्जनाच्या वेळी घडली. विसर्जन करताना पाच जण बुडाले. त्यातील दोघांना वाचविण्यात आले. उर्वरित तिघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले, तर एक जण बेपत्ता आहे.
साकीनाका येथे शनिवारी मध्यरात्री श्री गजानन मित्रमंडळाची मिरवणूक सुरू असताना मूर्तीच्या ट्रॉलीला हाय टेन्शन विद्युत वायरचा स्पर्श होऊन पाच जणांना धक्का बसला. त्यात बिनू शिवकुमार (३६) याचा जागीच मृत्यू झाला, तर तुषार गुप्ता (१८ ), धर्मराज गुप्ता (४४), आरुष गुप्ता (१२), शंभू कामी (२०) आणि करण कानोजिया (१४) हे पाच जण गंभीर जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, टाटा पॉवरच्या वीज वाहिनीचा ट्रॉलीला स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली.
झोपलेल्या दोन भावंडांना चिरडले, बालिकेचा मृत्यू
लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील मार्गावर शनिवारी पहाटे दोन भावंडांना ठोकरून वाहन चालक फरार झाला. या अपघातात चंद्रा वजणदार (२ वर्षे) या बालिकेचा मृत्यू झाला, तर तिचा भाऊ शैलू वजणदार (११ वर्षे) गंभीर जखमी झाला. शनिवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही दोन्हीही मुले रस्त्याच्या कडेला झोपली होती. त्यावेळी वाहन चालकाने त्यांच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर, जखमी मुलांना रुग्णालयात दाखल न करता तो फरार झाला.
विसर्जनाच्या आदल्या दिवशी अपघात
शुक्रवारी सकाळी लालबागच्या राजासह मुंबईतील गणपतींचे दर्शन घेऊन परतणाऱ्या एका तरुणाचा जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर भीषण अपघातात मृत्यू झाला.
शुक्रवारी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर पवई आयआयटीजवळ बेस्ट बसने दोन तरुणांना चिरडल्याची गंभीर घटना समोर आली. यामध्ये जोगेश्वरी येथे राहणाऱ्या देवांश पटेल या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले, तर स्वप्निल विश्वकर्मा हा तरुण गंभीर जखमी झाला.
शहापूरला तिघे बुडाले, दोघांचा मृत्यू, एक बेपत्ता
वासिंद, शहापूर : गणपती विसर्जनाच्या वेळी शहापुरातील भारंगी नदीवर शनिवारी पाच जण बुडाले होते. यातील दोघांना वाचविण्यात यश आले, तर बुडालेल्या तिघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले असून, एक जण बेपत्ता आहे. जीवरक्षक पथक, स्थानिक पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
आसनगावजवळील मुंडेवाडी येथील एका मंडळाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी गेलेला दत्ता लोटे हा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. त्याला वाचविण्यासाठी प्रतीक मुंडे, रामनाथ घारे, भगवान वाघ आणि कुलदीप जाखेरे यांनीही पाण्यात उड्या मारल्या, परंतु प्रसंगावधान राखत मित्रांच्या मदतीने योगेश्वर नाडेकर याने पाण्यात उतरून रामनाथ आणि भगवान यांना मोठ्या शिताफीने पाण्यातून बाहेर काढले. मात्र, अन्य तिघेजण बुडाले.
जीवरक्षक पथक आणि इतरांनी प्रतीक मुंडेला बाहेर काढले. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर यामधील दत्तू लोटे यांचा मृतदेह रविवारी दुपारी सापडला. कुलदीप जाखेरे या तरुणाचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले.