Motilal Nagar redevelopment project: Residents support Mhada survey | मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प : म्हाडाच्या सर्वेक्षणाला रहिवाशांनी सहकार्य करा
मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प : म्हाडाच्या सर्वेक्षणाला रहिवाशांनी सहकार्य करा

मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर १, २ व ३ येथील जुन्या वसाहतींचा संयुक्त पुनर्विकास प्रकल्प आदर्श नगर रचनेचा पथदर्शी प्रकल्प ठरणार असून, अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त या प्रकल्पाची व्याप्ती जाणून घेण्यासाठी जमिनीची उपलब्धता व रहिवाशांबाबत वस्तुस्थितीनुरुप माहिती जाणून घेण्याकरिता मंडळातर्फे उद्यापासून सुरू होणाऱ्या सर्वेक्षणाला रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी काल गोरेगाव येथे केले.  

मोतीलाल नगर-१ मधील गणेश मैदान येथे मुंबई मंडळातर्फे मोतीलाल नगर १, २ व ३ या संयुक्त पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाबाबत रहिवाशांसाठी नुकतेच सादरीकरण (Presentation) करण्यात आले, याप्रसंगी चव्हाण बोलत होते. चव्हाण म्हणाले, की सुमारे १४३ एकर जमिनीवर राबविण्यात येणाऱ्या मोतीलाल नगर १, २ व ३ या संयुक्त पुनर्विकास प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता हा म्हाडाचा सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प ठरतो. या प्रकल्पाअंतर्गत सुमारे ३ हजार ७०० रहिवाशांचे अत्याधुनिक आणि मोठ्या आकाराच्या सदनिकेत पुनर्वसन केले जाणार आहे. तसेच मूळ रहिवाशांचे पुनर्वसन केल्यानंतर सुमारे ४० हजार परवडणाऱ्या अतिरिक्त सदनिका सर्वसामान्य नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. 

मोतीलाल नगर १, २ व ३ या संयुक्त पुनर्विकास प्रकल्पातील मूळ रहिवाशांचे स्थलांतर संक्रमण शिबिरात न करता थेट नव्याने बांधण्यात येणाऱ्या सदनिकांमध्ये करण्याचे नियोजन मंडळातर्फे याप्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे, ही बाब या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे", अशी माहिती चव्हाण यांनी दिली. या प्रकल्पाकरिता पी. के. दास अँड असोसिएट्स यांची प्रकल्प नियोजन सल्लागार (PMC) म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षण हा या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असून स्थलाकृतिक (Topographical) व सामाजिक (Social) असे दोन प्रकारचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. स्थलाकृतिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध जमिनीबाबत माहिती तर सामाजिक सर्वेक्षणाद्वारे रहिवाशांची माहिती संकलित केली जाणार आहे. म्हाडावर लोकांचा विश्वास असून पारदर्शक, कार्यक्षमपणे, गतीने हा प्रकल्प राबवून रहिवाशांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.           

मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी बी. राधाकृष्णन म्हणाले, माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसारच हा प्रकल्प म्हाडामार्फत राबविला जात असून, उद्यापासून सुरू होत असलेले सर्वेक्षण हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा घटक आहे. या सर्वेक्षणानंतर लाभार्थी रहिवाशांना या प्रकल्पातून उपलब्ध होऊ शकणाऱ्या सुविधांबाबत स्पष्टता मिळणार आहे. या पात्र लाभार्थी रहिवाशांचे प्रथम पुनर्वसन हा या प्रकल्पाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. म्हाडाने सादर केलेल्या प्रस्तावावर रहिवाशांसह पुन्हा चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्या सूचना-हरकती यांची दखल घेऊनच पुढील कार्यवाही केली जाणार आहे, असे राधाकृष्णन म्हणाले.

तसेच रहिवाशांचे प्रथम पुनर्वसन या प्रकल्पाचा केंद्रबिंदू असून, पुनर्वसन प्रक्रियेमध्ये रहिवाशांना पुनर्विकासासंदर्भात शासनाच्या अद्ययावत नियमांप्रमाणे अधिकाधिक लाभ मिळवून देण्यास मंडळ कटिबद्ध असल्याचे   राधाकृष्णन यांनी सांगितले. प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली जात असून रहिवाशांकडून प्राप्त होत असलेल्या सूचना, मत देखील वेळोवेळी विचारात घेतल्या जात आहेत. काही रहिवाशांनी केलेल्या सूचनेनंतरच आजचा सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. 

तसेच प्रकल्पासंदर्भात रहिवाशांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी म्हाडातर्फे विशेष मार्गदर्शन कक्ष प्रकल्पस्थळी उभारण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी मुंबई मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी याप्रसंगी दिली. पी. के. दास यांनी मोतीलाल नगर संयुक्त पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन दर्शित करणारे पॉवरपॉईंट सादरीकरण रहिवाशांकरिता केले.

Web Title: Motilal Nagar redevelopment project: Residents support Mhada survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.