विदर्भाच्या मातीत उगतात ‘मोती’

By Admin | Updated: May 25, 2014 19:32 IST2014-05-25T19:28:07+5:302014-05-25T19:32:46+5:30

‘मोती’ उत्पादनाचा राज्यातील पहिला प्रयोग विदर्भात.

'Moti' growing in the soil of Vidarbha | विदर्भाच्या मातीत उगतात ‘मोती’

विदर्भाच्या मातीत उगतात ‘मोती’

राजरत्न सिरसाट/ अकोला

सौंदर्य खुलविण्यापासून ते आरोग्यासाठी लाभदायक तसेच आभुषणात महत्त्वाचे स्थान असलेल्या मोती उत्पादनावर विदर्भातील शेतकर्‍यांनी लक्ष केंद्रित केले असून, कमी खर्चात भरघोस उत्पादन देणार्‍या मोती उत्पादनाचा राज्यातील पहिला प्रयोग विदर्भात राबविण्यात येत आहे. पूर्व विदर्भात वैनगंगा नदीच्या पात्रात शिंपले मिळतात. या शिंपल्यापासूनच मोती तयार करण्यात येत आहेत. या शिंपल्यातून नैसर्गिक मोती तर मिळतातच; परंतु डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शिंपल्यामध्ये बीड्स अर्थात कॅल्शियम काबरेनेड टाकून हव्या त्या आकाराचे मोती निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. गोड्या पाण्याच्या शेततळ्य़ामधून याचे उत्पादन घेता येत असल्यामुळे कृषी शास्त्रज्ञांनी व कृषी विभागाच्या आत्माने मोती उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. पंधरा बाय पंधरा आकाराच्या शेततळय़ात मत्स्यपालन व शिंपले संवर्धन करू न मोती उत्पादन घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एका पंधरा बाय पंधराच्या शेततळ्य़ात जवळपास पाच हजार शिंपल्यांचे संवर्धन केले जाते. या पाच हजार शिंपल्यांसाठी एक शिंपले २0 रुपये, या प्रमाणे एक लाख खर्च येतो. वर्षाकाठी केवळ मोती उत्पादन हे सरासरी पाच ते सहा लाख रुपये मिळते. शिवाय त्याच शेततळ्य़ात मत्स्यपालन करता येत असल्यामुळे दोन प्रकारचे उत्पादन घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मोत्याची किंमत कॅरेटमध्ये आहे. एका शिंपल्यापासून जवळपास ४00 ते ५00 मोती मिळतात. नव्या तंत्रज्ञानामुळे देवी, देवतांच्या आकारासह विविध आकाराचे मोती तयार केले जात आहेत. या मोत्यांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मोठी मागणी आहे. नक्षी असलेल्या मोत्यांची किंमत तर एक हजाराच्यावर आहे

** वैनगंगेत शिंपले

 वैनगंगेच्या गोड्या पाण्यात शिंपले आहेत. शिंपल्यापासून मोती उत्पादनाचे प्रयोग बघण्यासाठी राज्यातील शेतकरी सध्या कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधत आहेत.

**कमी खर्चाचा जोडधंदा

कृषी विभागाने राज्यभर शेततळ्य़ाचं जाळं विणलं आहे. या शेततळ्य़ात मोती तयार करता येतात म्हणूनच कृषी विभागाने या कमी खर्चाच्या जोडधंद्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

Web Title: 'Moti' growing in the soil of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.