प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झाल्याने मातेचा मृत्यू, बाळ सुखरूप; हलगर्जीपणाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 07:09 IST2024-12-28T07:08:29+5:302024-12-28T07:09:04+5:30

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला

Mother dies due to postpartum hemorrhage in Palghar | प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झाल्याने मातेचा मृत्यू, बाळ सुखरूप; हलगर्जीपणाचा आरोप

प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झाल्याने मातेचा मृत्यू, बाळ सुखरूप; हलगर्जीपणाचा आरोप

रवींद्र साळवे 

मोखाडा : अतिदुर्गम मोखाडा तालुक्यातील आरोग्य सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असल्याचे वास्तव पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. एका गर्भवती मातेला प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याची घटना मोखाड्यात घडली आहे, परंतु डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

मोखाडा तालुक्यापासून १५ किमी अंतरावर असलेल्या कोलद्याचा पाडा येथील आशा नंदकुमार भुसारे (वय २२) हिला प्रसूतीसाठी २५ डिसेंबरला पहाटे मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु दिवसभर कोणताही उपचार न करता डिलिव्हरी पेशंटला इथून तिथून ये-जा करण्यास सांगितले. यानंतर आता प्रसूती होईल, नंतर होईल, यामध्ये दुसरा दिवस उलटल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर  २६ तारखेला सकाळी ९:०० वाजेच्या दरम्यान प्रसूती होऊन या मातेने बालकाला जन्म दिला, त्यानंतर रक्तस्त्राव होऊ लागला. एक तास रक्तस्त्राव सुरू असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर पुढील उपचारासाठी तिला जव्हार कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे तिला चार बाटल्या रक्त देण्यात आले. तरीदेखील रक्तस्त्राव सुरूच होता. पुढील उपचारासाठी नाशिक सिव्हिल येथे पाठवण्यात आले. यावेळी अर्ध्या रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.  


माझ्या पत्नीची डिलिव्हरी नॉर्मल झाली, परंतु यानंतर डॉक्टर, नर्स यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यानेच रक्तस्त्राव झाला आहे. रक्तस्त्राव झाल्यानंतरही खूप विलंब लावला. वेळीच आमचा पेशंट सिव्हिल रुग्णालयात पोहचला असता तर वाचला असता. याची योग्य ती चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.
- नंदकुमार भुसारे, मृत महिलेचे पती.

प्रसूती झाल्यानंतर काही वेळाने गर्भपिशवी कडक होणे गरजेचे असते अन्यथा रक्तस्त्राव सुरू होतो. या मातेची गर्भपिशवी कडक न झाल्याने तिला रक्तस्त्राव सुरू झाला. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी प्रयत्न केले. तिला तत्काळ रक्ताच्या बॉटलही देण्यात आल्या, परंतु तिचा रक्तस्त्राव थांबत नव्हता. यावेळी गर्भपिशवीचे ऑपरेशन करणे, गर्भपिशवी काढून टाकणे, या शस्त्रक्रिया कराव्या लागतात, परंतु आपल्याकडे अद्ययावत सुविधा नसल्याने नाशिक सिव्हिलला पाठवण्यात आले, परंतु तिचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला.
- डॉ. भरत महाले, वैद्यकीय अधीक्षक, मोखाडा ग्रामीण रुग्णालय.
 

Web Title: Mother dies due to postpartum hemorrhage in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.