मान्सून आजपासून पुन्हा सक्रिय होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 06:38 AM2019-08-26T06:38:54+5:302019-08-26T06:39:10+5:30

बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून, त्यामुळेही हवामानात उल्लेखनीय बदल होतील.

The monsoon will be reactivated from today | मान्सून आजपासून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून आजपासून पुन्हा सक्रिय होणार

Next

मुंबई : मध्य महाराष्ट्राला झोडपून काढल्यानंतर विश्रांतीवर गेलेला मान्सून आजपासून पुन्हा सक्रिय होणार आहे. २६ ते ३० आॅगस्टदरम्यान मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र, अहमदाबाद, केरळच्या काही भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून, त्यामुळेही हवामानात उल्लेखनीय बदल होतील.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पूर्व उपनगरातील वांद्रे-कुर्ला संकुल, सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर आणि साकीनाक्यासह लगतच्या परिसराला पावसाने झोडपून काढले. सुमारे पंधरा मिनिटे पडलेल्या मुसळधार सरीनंतर मात्र बेपत्ता झालेला पाऊस रात्रीपर्यंत फिरकला नव्हता. राज्याच्या विचार करता, गेल्या २४ तासांत मराठवाड्यातील उदगीर, उस्मानाबाद येथे हलक्या पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात गोंदियातही पाऊस नोंदविण्यात आला आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस नोंदविण्यात आला आहे.
२६ आॅगस्ट रोजी गुजरातचा काही भाग, पश्चिम मध्य प्रदेशात मुळसधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, सौराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, कर्नाटकचा किनारी भाग, केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्किमध्ये वादळी वारे वाहतील. शिवाय विजांचा कडकडाट होईल. समुद्र किनारी ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहतील. परिणामी, मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुसळधार पावसाची शक्यता
२७ आॅगस्ट : सौराष्ट्र, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, कोकण, गोवा, कर्नाटक किनारा आणि केरळ.
२८ आॅगस्ट : अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, गुजरात. कोकण, गोवा, कर्नाटक किनारा, केरळ.
२९ आॅगस्ट : अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक किनारा, केरळ.
राज्यासाठी अंदाज
२६ आॅगस्ट : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारी सोसाट्याचा वारा वाहील.
२७ आणि २८ आॅगस्ट : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारी सोसाट्याचा वारा वाहील.
मुंबईसाठी अंदाज
सोमवारसह मंगळवारी शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, २५ अंशाच्या आसपास राहील.

Web Title: The monsoon will be reactivated from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस