अखेर बरसला मान्सून!
By Admin | Updated: July 4, 2014 01:19 IST2014-07-04T01:19:52+5:302014-07-04T01:19:52+5:30
येणार येणार म्हणून ज्याची चातकासारखी वाट बघणे सुरू होते तो मान्सून अखेर गुरुवारी नागपुरात बरसला. गेल्या एक महिन्यापासून उकाड्याने त्रस्त असणाऱ्या नागपूरकरांना आज दिलासा मिळाला.

अखेर बरसला मान्सून!
वातावरणात गारवा : उकाड्यापासून सुटका
नागपूर : येणार येणार म्हणून ज्याची चातकासारखी वाट बघणे सुरू होते तो मान्सून अखेर गुरुवारी नागपुरात बरसला. गेल्या एक महिन्यापासून उकाड्याने त्रस्त असणाऱ्या नागपूरकरांना आज दिलासा मिळाला.
जून महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. मात्र मान्सून उशिरा दाखल झाला. १९ तारखेला तो विदर्भात दाखल झाला खरा, पण बरसला मात्र नाही. उलट उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत गेली. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला तर शहरात उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले. त्यामुळे रोज पावसाची वाट बघणे सुरू होते. आज येणार, उद्या बरसणार अशी प्रतीक्षा सुरू होती. मात्र हवामान खात्याचे अंदाज त्याला दुजोरा देणारे नव्हते. बुधवारी मुंबईत पावसाने हजेरी लावल्यावर आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. मुंबईत पाऊस झाल्यावर सर्वसाधारणपणे दोन दिवसाने विदर्भात पाऊस पडतो. यावेळी दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बरसलेल्या धारांमुळे नागपूरकर सुखावले.
दुपारपर्यंत कडाक्याचे ऊन असताना नंतर वातावरणात बदल होत गेला. दुपारनंतर शहराच्या काही भागात हलक्या सरीही आल्या. पण त्यामुळे फक्त रस्तेच ओले झाले. मात्र रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातील उकाडा दूर झाला. कधी जोरदार तर कधी रिपरिप असे पावसाचे स्वरूप होते. रात्री ११ वाजेपर्यंत तो सुरूच होता. हवामान खात्याने पुढच्या २४ तासातही पावसाची शक्यता वर्तविली आहे. (प्रतिनिधी)