Deputy CM Ajit Pawar News: मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांची सुरक्षितता, बचाव व मदतकार्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्यासाठीच्या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात. मुसळधार पावसाची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांनी सावध रहावे. सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहून त्यांच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुसळधार पाऊस होत असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे ग्रामीण भागातील गावांचा दौरा करत असतानाच, मंत्रालयातील राज्यस्तरीय आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापन केंद्राकडूनही अन्य जिल्ह्यातील पाऊस, धरणांची स्थिती, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पाऊस होत असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन परिस्थितीची, मदतकार्याची माहिती घेतली. शेतीचे, पिकांचे, पशुधनाचे, घरांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्य आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी सतर्क रहावे, परस्परांच्या संपर्कात राहून समन्वयाने, सहकार्याने बचाव, मदतकार्य तात्काळ राबवावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
राज्यातील परिस्थितीचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुंबई उपनगर रेल्वेसेवेला पावसाचा फटका बसला असून हार्बर रेल्वेसेवा बंद होती. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सेवा विलंबाने सुरु होत्या. महाडकडून स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाकडे जाणारा रस्ता पावसामुळे बंद आहे. पंढरपूरला नदीकाठच्या एका मंदिरात अडकून पडलेल्या तीन पूजाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात थांबून नागरिकांना आवश्यक मदत करावी, अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पाऊस सुरु असलेल्या भागातील नागरिकांनी शक्यतो घरीच थांबावे. घरात पाणी भरण्याची शक्यता असल्यास सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. आत्यंतिक गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. राज्य शासन व स्थानिक स्वराज संस्थांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही आपले कर्तव्य पार पाडत असताना स्वत:चीही काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.