मोनो रेल्वे धावणार आऊटरवर
By Admin | Updated: September 9, 2014 01:17 IST2014-09-09T01:17:36+5:302014-09-09T01:17:36+5:30
झपाट्याने विकास होत असल्याने शहरालगतच्या भागात मोनो रेल्वे चालविण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार आहे. याबाबतचा विस्तृत अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या प्रस्तावाला स्थायी

मोनो रेल्वे धावणार आऊटरवर
स्थायी समितीचा ग्रीन सिग्नल : आठ महिन्यात डीपीआर
नागपूर : झपाट्याने विकास होत असल्याने शहरालगतच्या भागात मोनो रेल्वे चालविण्याचा महापालिका प्रशासनाचा विचार आहे. याबाबतचा विस्तृत अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने सोमवारी मंजुरी दिली.
२०२० सालातील लोकसंख्या विचारात घेऊन हा प्रकल्प राबविला जाणार आहे. आठ महिन्यात प्रकल्प अहवाल मागविला आहे. पहिल्या टप्प्यात ५० कि.मी. लांबीच्या मार्गाचे सर्वेक्षण केले जाईल. मेट्रोला मोनो रेल्वेची फिडरप्रमाणे मदत होईल, असाही प्रस्ताव विचाराधीन आहे.
मेट्रो रेल्वेपूर्वी शहरात मोनो रेल्वे धावेल, अशी चर्चा होती. परंतु मोनो रेल्वेचा जेमतेम प्रस्ताव तयार केला जात आहे. मोनो रेल्वे मास रॅपिड ट्रान्झिस्ट सिस्टमसाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्याबाबत निविदा मागविण्यात आल्या आहेत. गुडगावच्या दोन व पुणे येथील एका कंपनीने निविदा सादर केली. कमी दराची मे. मोनार्च सर्वेअर अॅन्ड इंजिनिअरिंग कन्सलटंट प्रा.लि. या कंपनीची निविदा समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली.
शहराचा होत असलेला विकास व विस्तार विचारात घेता, भविष्यात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, याचा विचार करून शहरालगतच्या भागात मोनो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी दिली. विस्तृत प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला पाठविला जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मंजुरीनंतर मोनो रेल्वेच्या कामाला सुरुवात होईल. मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या मागीं लागेल. तसेच शहरालगतच्या भागात मोनो रेल्वेमुळे वाहतुकीची समस्या सुटेल, असा विश्वास बोरकर यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
सक्षम यंत्रणा नाही
नागपूर शहराचे क्षेत्रफळ २७५.६५ चौ. कि.मी.आहे. शहरात १२,३७,०१९ वाहने असून, १९०७ कि.मी. लांबीचे मार्ग आहेत. मुख्य मार्गांची लांबी ५०० कि.मी. आहे. शहरात २५० चौक आहेत. बसमधून दररोज १,८०,००० नागरिक प्रवास करतात. परंतु शहरात सार्वजनिक वाहतूक सुरळीत चालावी यासाठी सक्षम यंत्रणा नाही.