पैसे संपले, उपचार थांबले; मुलाला जगविण्यासाठी ३ महिन्यापासून आईची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 06:11 AM2021-01-27T06:11:42+5:302021-01-27T06:12:03+5:30

तीन महिन्यापासून सुरू आहेत उपचार, २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातात तो जीवनमृत्यूशी संघर्ष करत आहे

Money ran out, treatment stopped; Mother struggles for 3 months to save her child | पैसे संपले, उपचार थांबले; मुलाला जगविण्यासाठी ३ महिन्यापासून आईची धडपड

पैसे संपले, उपचार थांबले; मुलाला जगविण्यासाठी ३ महिन्यापासून आईची धडपड

googlenewsNext

नागपूर : आई-वडिलांचा म्हातारपणाचा आधार, तीन महिन्यापासून तो बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात पडून आहे. डॉक्टरांकडून त्याला जगविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण उपचारात पैशांची मर्यादा आली आहे. 

आई-वडिलांनी जमा केलेली जवळची पुंजी, नातेवाईकांकडून कर्जरूपाने घेतलेले पैसे आतापर्यंत उपचारावर खर्च झाले आहेत. आता जवळचे सर्व आर्थिक स्रोत आटले आहेत. त्यामुळे उपचारही थांबला आहे. पण आईची धडपड अजूनही थांबलेली नाही. मुलाला जगविण्यासाठी ती दारोदारी भटकत आहे. तुशाल धनिराम परदेसी हा २५ वर्षीय युवक २६ ऑक्टोबर रोजी कळमना रोडवर झालेल्या अपघातात जखमी झाला. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. तेव्हापासून त्याच्यावर सीए रोडवरील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत त्याचे ४ ऑपरेशन झालेले आहेत. 

रुग्णालयातील डॉक्टर त्याला जगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यांना विश्वास आहे की तुशाल नक्कीच बरा होईल. डॉक्टरांनी दिलेल्या या दिलाशापोटी तुशालचे आईवडीलही वाटेल ती तडजोड करीत आहेत. तुशालचे वडील धनिराम हे हातमजुरीचे काम करतात. आईसुद्धा शिलाई काम करते. तुशाल हा एका फायनान्स कंपनीमध्ये नोकरी करीत होता. मुलाचा आधार झाल्याने घर सुरळीत सुरू होते. पण २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातात तो जीवनमृत्यूशी संघर्ष करत आहे. या संघर्षात आई-वडिलांची जमापुंजी खर्च झाली आहे. 

नातेवाईक व कर्जरूपाने घेतलेला पैसाही त्याच्या उपचारात संपला आहे. आतापर्यंत तुशालच्या उपचारात १८ लाख रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. हातचा, कर्जरूपात घेतलेला पैसा आता संपला आहे. आता डॉक्टरांनी परत एक ऑपरेशन सांगितले आहे. तुशाल चालत घरी जाईल, असा विश्वास आईला दिला आहे. आई शोभा त्याच्या उपचारासाठी पैसा गोळा करण्यासाठी भटकंती करीत आहे. कुठेतरी आशेचा दीप पेटेल, मुलगा बरा होईल, असा विश्वास तिला आहे. मुलाला जगविण्यासाठी आईची ही धडपड, तिच्या डोळ्यातून अहोरात्र पडणारे अश्रू पुसायला समाजातील सहहृदयींनी पुढे येण्याची गरज आहे.

आईच्या अपेक्षांची ओंजळ भरावी
आई शोभाची धडपड मानवी संवेदनांना पाझर फुटायला लावणारी आहे. गेल्या काही महिन्यापासून तिच्या तोंडातून शब्द कमी आणि डोळ्यातून अश्रूच तरळत आहेत. तिच्या अपेक्षांची ओंजळ भरावी, यासाठी तिला मदतीचा आधार हवा आहे. हा आधार बनण्याची इच्छा असलेल्यांनी ८९९९२४५१९३ या क्रमांकावर संपर्क करावा. अथवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वैशालीनगर शाखेतील ३३४३३६४३३६६ या खात्यातसुद्धा मदत करता येईल.

Web Title: Money ran out, treatment stopped; Mother struggles for 3 months to save her child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.