विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार पुस्तकाचे पैसे
By Admin | Updated: January 14, 2017 05:03 IST2017-01-14T05:03:26+5:302017-01-14T05:03:26+5:30
सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तके थेट त्यांच्या हातात दिली जात होती. पण नवीन आदेशानुसार

विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार पुस्तकाचे पैसे
मुंबई : सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तके थेट त्यांच्या हातात दिली जात होती. पण नवीन आदेशानुसार, पाठ्यपुस्तकांचे पैसे आता विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता सुमारे दोन कोटी विद्यार्थ्यांची बँकेत खाती उघडावी लागणार आहेत.
विद्यार्थ्यांना हातात थेट पुस्तके न मिळता आता पैसे देण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक आणि शिक्षण सचिव नंदकुमार यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके शाळांच्या माध्यमातून दिली जात होती. पण पाठ्यपुस्तके लाभाची वस्तू असल्याने यापुढे थेट विद्यार्थ्यांना देण्यात येणार नाही.
बँकेमध्ये विद्यार्थ्यांची खाती काढताना त्यासोबत संबंधित विद्यार्थ्याच्या आधार कार्ड क्रमांकाची नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची बँक खाती तत्काळ उघडण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)