मोदी संघस्थानाला भेट देणार?
By Admin | Updated: August 15, 2014 00:45 IST2014-08-15T00:45:29+5:302014-08-15T00:45:29+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पोहोचविण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका राहिली आहे. संघाचे उगमस्थान असलेल्या

मोदी संघस्थानाला भेट देणार?
स्वयंसेवकांमध्ये उत्सुकता : दौऱ्याचे वेळापत्रक न आल्याने संभ्रम कायम
योगेश पांडे - नागपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पोहोचविण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका राहिली आहे. संघाचे उगमस्थान असलेल्या उपराजधानीत पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी प्रथमच येत आहेत. त्यामुळे ते संघस्थानाला भेट देणार काय, यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये उत्सुकता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसराला भेट देण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील मौन धारण केले असून, वरिष्ठ पातळीवर मोदीभेटीसंदर्भात सत्यता पडताळून पाहण्यात येत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ९४ वर्षांच्या इतिहासात संघाने केवळ दोनदाच लोकसभा निवडणुकांमध्ये सक्रिय भूमिका घेतली. यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यात संघाची फार मदत झाली, हे भाजपाचे नेते जाहीरपणे कबूल करीत आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी संधी मिळेल तेव्हा संघाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. साधारणत: याअगोदरच्या सरसंघचालकांकडून राजकीय विषयांवर मतप्रदर्शन करण्यात येत नव्हते व भाजपाला जाहीर सल्ला देण्यात येत नव्हता.
तर चुकीचा संदेश जाईल
विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मात्र भाजपाला हक्काच्या चार गोष्टी सांगतात आणि प्रसंगी भाजप नेत्यांना कठोर बोल ऐकविण्यासदेखील मागे-पुढे पाहत नाहीत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या रचनेच्या वेळी संघाच्या शब्दाला किती मान आहे, हे दिसूनच आले. अलीकडेच राम माधव आणि ज्येष्ठ प्रचारक शिव प्रकाश यांनी भाजपात प्रवेश केला. एकूणच या सरकारवर संघाचा प्रभाव असून तो लपून राहिलेला नाही.
ही पार्श्वभूमी लक्षात घेता मोदी यांच्या नागपूर भेटीदरम्यान संघाप्रति त्यांची काय भूमिका राहील, याकडे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि काही दिवसांअगोदर सरसंघचालकांनी भुवनेश्वर येथून दिलेले कठोर ‘बौद्धिक’ यामुळे मोदी यांच्या नागपूर भेटीला अधिक महत्त्व आले आहे. मोदी नागपुरात येतील आणि संघ मुख्यालय किंवा स्मृतिमंदिराला भेट देण्यासाठी वेळ काढणार नाहीत, अशी शक्यता कमीच आहे.
मोदींनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून काही मिनिटांसाठी का होईना पण डॉ. केशव बळीराम हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या स्मारकाला भेट देऊन वंदन करावे, अशी संघ स्वयंसेवकांची अपेक्षा आहे. जर मोदी यांनी संघस्थानाला भेट दिली नाही तर चुकीचा संदेश जाईल, असे मतदेखील स्वयंसेवकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
संघाचे मौन
संघ मुख्यालयाच्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मोदी तेथे न जाता रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसराला भेट देऊ शकतात. पुढील दोन ते तीन दिवसांत मोदींच्या भेटीचे वेळापत्रक येण्याची शक्यता बळावली आहे. मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात याबद्दल अद्याप कुठलीही सूचना आली नसल्याने यासंदर्भात आताच काही बोलणे योग्य होणार नाही, असे म्हणत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.