कल्याण : पालिका शाळांमधील घटती विद्यार्थी पटसंख्या आणि घसरत चाललेला दर्जा सुधारण्यासाठी काही ठिकाणी केंद्रीकरणाच्या माध्यमातून मॉडर्न शाळा संकल्पना राबवण्यावर भर देणार असल्याचे शिक्षण समितीच्या नवनिर्वाचित सभापती वैजयंती गुजर-घोलप यांनी सांगितले. घोलप यांनी शुक्रवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या उपस्थितीत सभापतीपदाचा पदभार स्वीकारला.मॉडर्न शाळेची संकल्पना सर्वप्रथम देवळेकर यांनी मांडली. त्यासाठी शाळांचे सर्वेक्षण करून तसेच शाळांच्या मागणीनुसार संकल्पना राबवणार असल्याचे घोलप म्हणाल्या.समितीच्या पहिल्याच सभेत वर्षभर कामकाज कसे चालेल, याची चुणूक दिसेल, असे त्या म्हणाल्या. शिक्षण विभाग आता केडीएमसीच्या अखत्यारीत आल्याने येथील अधिकाऱ्यांना बढती देऊन त्यांच्या माध्यमातून प्रशासकीय कारभार चालवला जाईल, असे घोलप यांनी सांगितले. बुधवारी सकाळी ११ वाजता समितीची पहिली सभा होत आहे. यात विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)
मॉडर्न शाळा संकल्पना राबवणार
By admin | Updated: April 8, 2017 04:47 IST