मुंबईसमोर तेल अविवचा आदर्श

By admin | Published: May 3, 2015 12:38 AM2015-05-03T00:38:20+5:302015-05-03T00:38:20+5:30

इस्रायल भेटीवर गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पाच शहरांचा विकास स्मार्ट सिटीप्रमाणे आणि तेल अविवनुसार

Model of the oil aviva in front of Mumbai | मुंबईसमोर तेल अविवचा आदर्श

मुंबईसमोर तेल अविवचा आदर्श

Next

इस्रायल भेटीवर गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पाच शहरांचा विकास स्मार्ट सिटीप्रमाणे आणि तेल अविवनुसार मुंबईचा विकास करण्याचा मानस प्रकट केला आहे. मुंबई शहराच्या विकासाचा विचार करताना तेल अविव कसे आहे, तेथील लोकजीवन आणि प्रशासन कसे आहे याची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण स्मार्ट सिटी ही केवळ नाव देऊन किंवा घोषणा करून होत नसते, त्यासाठी लोकांच्या वागण्यात आणि विचारांमध्येही बदल व्हावा लागतो.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी तेल अविवच्या महापौरांशी चर्चा करताना, तेल अविवप्रमाणे मुंबईमध्ये आॅनलाइन म्युनिसिपल सेवा मिळाव्यात, पार्किंग आणि वाहतूक समस्या कमी व्हाव्यात तसेच ग्रीन कन्स्ट्रक्शनसारख्या मुद्द्यांना स्पर्श केला. या चर्चेनुसार महाराष्ट्रातील विविध शहरांचा विकास व्हावा यासाठी तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्याचेही या वेळेस निश्चित करण्यात आले. महाराष्ट्रातील नागपूर, मुंबई, औरंगाबाद, अमरावतीसारख्या शहरांचा विकास सोशल मीडिया, नवे तंत्रज्ञान, समुदाय सहभाग, ई-गव्हर्नन्स आदींचा समावेश करून करण्याची इच्छा मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केली.
शहरांच्या परिसरामध्ये सुधारणा करणे, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे, समाजाचे व लोकांचे आर्थिक-सांस्कृतिक राहणीमान सुधारणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे हे स्मार्ट सिटीचे उद्दिष्ट असते. तेल अविवने या सर्वच बाबतीत उत्तम प्रगती केली आहे. नियोजन व कायदेपालन यामध्ये तेल अविवने आदर्श वस्तुपाठच घालून दिला आहे. मूलभूत सुविधांचा स्मार्ट तंत्रज्ञान वापरून अपव्यय कसा टाळायचा हे तेल अविवकडून खरेच शिकण्यासारखे आहे.
तेल अविव हे इस्रायलमधील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे शहर असून ते भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. या शहरामध्ये अनेक महत्त्वाच्या कंपन्या, व्यापार केंद्रे व बहुतांश देशांचे दूतावास आहेत. याशिवाय तेल अविव मेट्रोपोलिटन रिजनमध्ये दाट लोकसंख्या असल्याने या विभागाला विशेष महत्त्व आहे. थोडक्यात तेल अविवला मुंबईप्रमाणे इस्रायलच्या आर्थिक घडामोडींचे केंद्र मानले जाते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून तेल अविवला विशेष महत्त्व येऊ लागले. या काळातच युरोपातील विविध देशांमधून ज्यू येण्याला सुरुवात झाली होती. त्यामुळे या येणाऱ्या लोकसंख्येला डोळ्यासमोर ठेवून नियोजन करण्यात आले. १९२५ साली स्कॉटिश समाजशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ पॅट्रिक गेडीस यांनी तेल अविवचा मास्टर प्लॅन केला. त्यानुसार एकमेकांना काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांची व वस्त्यांची योजना करण्यात आली. युरोपातून येणाऱ्या लोकसंख्येचा विचार करत शहराचा भविष्यात विकास करण्यात आला.
आजच्या विकसित तेल अविवमध्ये सर्व महत्त्वाची स्थानके रस्ते, रेल्वेने जोडलेली आहेत. रस्त्यांवर वाहनांसाठी कडक नियम केलेले असून त्याचे पालनही तितक्याच काटेकोरपणे केले जाते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूस सायकलसाठी विशेष मार्गही ठेवण्यात आलेले दिसून येतात. सर्वात चांगली बाब म्हणजे पादचारी व सायकलस्वारांनाही वाहनधारकांइतकाच सन्मान मिळतो. या शिस्त आणि कायदेपालनाची सवय यामुळे तेल अविवमध्ये अपघातांचे प्रमाणही कमी झाले आणि वाहतूकही वेगवान झाली आहे.
तेल अविवचा किंबहुना इस्रायलचा सर्व जगातील शहरांनी घेण्यासारखा गुण म्हणजे पाण्याचा जपून वापर. तेल अविवमध्ये पिण्यासाठी व वापरायचे पाणी सी आॅफ गलिली या इस्रायलमधील एकमेव मोठ्या गोड्या पाण्याच्या जलाशयातून येते. शहरातील नागरिक पाण्याचा वापर जपून करतातच, त्याहून वापरलेल्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते शेतीसारख्या इतर कामांसाठी वापरले जाते. रस्त्याच्या कडेला असणारी झाडे तसेच रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या फुलझाडांनाही पाणी ठिबक सिंचनाद्वारे देण्यात येते. शहरातील सांडपाणी एका मोठ्या प्रक्रिया केंद्रामध्ये आणून ते शुद्ध केले जाते. त्यामुळे पाण्याचा अत्यंत जपून वापर केला जातो. पाण्याप्रमाणे प्रत्येक घरावर व इमारतीवर दिसणारे चित्र म्हणजे सौरऊर्जेचे संयंत्र. सर्व इमारतींमध्ये सौरऊर्जेवर पाणी तापविण्याची साधने बसविलेली आहेत. याबरोबरच तंत्रज्ञान, सुधारित वाहतूक आणि कचरा व्यवस्थापन, जल व्यवस्थापनाच्या बाबतीत शहराने मोठी प्रगती केली आहे. त्याचप्रमाणे वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापरही केला जातो. शहरातील अनेक भागांमध्ये टॅक्सी व प्रवाशांना वाहून नेणाऱ्या वाहनांमध्ये वायफायची सोय आहे. मुंबईने जर आता तेल अविवला मॉडेल म्हणून डोळ्यासमोर ठेवले आहे, तर त्याचप्रमाणे कायदेपालन आणि तितकीच शिस्तही अंगी बाणवावी लागेल.

Web Title: Model of the oil aviva in front of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.