मोबाइल चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: June 7, 2017 05:09 IST2017-06-07T05:09:25+5:302017-06-07T05:09:25+5:30
मौजमजा करण्यासाठी वसई विरार आणि मुंबई परिसरात मोबाइल चोरणाऱ्या प्रिन्स उर्फ नीलेश सिंग (२०) या सराईत चोराला विरार पोलिसांनी अटक केली

मोबाइल चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : मौजमजा करण्यासाठी वसई विरार आणि मुंबई परिसरात मोबाइल चोरणाऱ्या प्रिन्स उर्फ नीलेश सिंग (२०) या सराईत चोराला विरार पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे कारनामे पाहून पोलिसांनी त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे.
तो वसईतील रहिवासी असून सध्या हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करीत आहे. मात्र, मौजमजा करण्यासाठी तो चक्क मोबाइल चोरण्याचे काम करीत असल्याचे पोलीस तपासात उजेडात आले आहे. संध्याकाळच्या वेळी रस्त्यावरून मोबाइलवर बोलत जात असलेल्या व्यक्तींचे मोबाइल चोरून तो दुचाकीवरून येऊन पळून जात असे. त्याच्या विरोधात मोबाइल चोरीचे अनेक गुन्हे विरार, माणिकपूरसह मुंबईतील समतानगर आणि ताडदेव पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
मुंबई आणि वसईतील पोलीस गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मागावर होते. विरार पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला त्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. यावेळी त्याच्याकडून एक मोबाइल फोन हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव माणिकपूर पोलिसांनी वरिष्ठांकडे पाठवला आहे.