मोबाईलचे व्यसन होतेय जीवघेणे

By admin | Published: July 8, 2017 01:48 AM2017-07-08T01:48:33+5:302017-07-08T01:48:33+5:30

आठ वर्षांचा यश एक तासापासून यू ट्यूबवर व्हिडिओ पाहण्यात मग्न झाला होता... हातातली कामे उरकल्यावर आईचे लक्ष गेले आणि तिने हटकले.

Mobile addiction is life threatening | मोबाईलचे व्यसन होतेय जीवघेणे

मोबाईलचे व्यसन होतेय जीवघेणे

Next

प्रज्ञा केळकर-सिंग/लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आठ वर्षांचा यश एक तासापासून यू ट्यूबवर व्हिडिओ पाहण्यात मग्न झाला होता... हातातली कामे उरकल्यावर आईचे लक्ष गेले आणि तिने हटकले... काही वेळाने ‘यश, आता मोबाईल ठेव हं,’ असा धमकीवजा इशाराही दिला...‘थांब गं आई,’ असे म्हणून तो पुन्हा मोबाईलमध्ये रमला... आता मात्र आईचा पारा चढला आणि तिने यशच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. यश प्रचंड संतापला, त्याने वस्तू फेकून आदळ-आपट करायला सुरुवात केली आणि ‘माझ्या मनासारखे होत नसेल, तर मला जगायचेच नाही’ असे म्हणत आपल्या खोलीत जाऊन त्याने धाडकन दार लावून घेतले. आपल्या चिमुरड्याचे विचित्र वागणे पाहून आई भांबावून गेली.

आई-वडिलांनी मोबाईल हातातून काढून घेतल्याने नऊ वर्षांच्या मुलाने स्वत:चा हात कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच हरियाणामध्ये घडली. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला लाड म्हणून दिल्यानंतर मुलांना मोबाईलचे व्यसन लागल्याची तक्रार पालकांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

आजकाल घराघरांत असे चित्र सर्रास पहायला मिळत आहे. दोन वर्षांच्या मुलापासून प्रत्येकाला मोबाईलचे अक्षरश: वेड लागले आहे. सतत मोबाईल हाताळण्याची सवय लागल्याने पालकांनी मोबाईल हिसकावून घेतला, तर ती गोष्ट मुलांना सहन होत नाही. मनासारखे होत नसल्याने पालकांना आत्महत्येची धमकी देण्याची मानसिकता मुलांमध्ये बळावत आहे.

या परिस्थितीला मोठ्या प्रमाणात आई-वडीलच जबाबदार असून, त्यांनीच मुलांना या सवयीपासून परावृत्त करणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

याबाबत ‘लोकमत’शी बोलताना डॉ. उदय ठकार म्हणाले, ‘‘गेल्या काही काळामध्ये चौकोनी अथवा त्रिकोणी कुटुंबाची संकल्पना उदयाला आली आहे. आई-वडील नोकरी करणारे असल्याने त्यांना मुलांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. मुलांसाठी भरपूर खर्च करून, त्यांचे हट्ट पुरवून पालक भरपाई करण्याचा प्रयत्न करतात. हातातील कामे आटोपता यावीत आणि तोवर मुलाने शांत बसावे, म्हणून आई लहान मुलाच्या हातात मोबाईल सोपवते. हळूहळू मुलांना मोबाईलची सवय लागते. मोबाईल हातात असल्याशिवाय मुलगा जेवत नाही, अशी तक्रार पालकांकडून केली जाते तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आपणच मुलांना ही सवय लावल्याचे पालक सोयीस्करपणे विसरतात. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यावर जागे होतात. मुलांना मोबाईलपासून परावृत्त करणे, नात्यांचे महत्त्व पटवून देणे, मैदानी खेळांची सवय लावणे या सवयी पालकच मुलांना लावू शकतात.’’

पालकांनी मोबाईल हातातून काढून घेतला, की मुलांमध्ये राग आणि तणावाची लक्षणे दिसू लागतात. मुले भयंकर चिडतात आणि विचित्र वागू लागतात.

आई-बाबा आपले सर्व हट्ट पुरवतात, हे माहीत असल्याने मुले ‘इमोशनल ब्लॅकमेल’ ककू लागतात. ‘मी जेवणार नाही, बोलणार नाही’ इथपासून घरातून ‘निघून जाईन, आत्महत्या करेन’अशी धमकी देतात.

अशा वेळी
पालकांनी हतबल होण्यापेक्षा निग्रहाने मुलाच्या सवयींमध्ये बदल करणे, त्याला सामाजिक बांधिलकी शिकवणे, शेजारी, नातेवाईक यांच्याशी संवाद साधण्यास शिकवणे आदी
उपाय अवलंबणे आवश्यक असल्याचे मतही डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

लहान मुलांमधील मोबाईलचे व्यसन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोणतेही मूल मोबाईलचे वेड घेऊन जन्माला येत नाही. पालक त्याला या साधनाची ओळख करून देतात. मुलांनी टेक्नोसॅव्ही असले पाहिजे, असा विनाकारण बागुलबुवा केला जातो. मोबाईलशिवाय आपले काहीही अडत नाही, याची आधी पालकांना जाणीव होणे आवश्यक आहे. मुले पालकांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे मोबाईल वापराबाबत पालकांनी तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. मुले मोबाईलच्या आहारी गेली असतील, तर निग्रहाने त्यांना परावृत्त करायला हवे. मुलांच्या व्यक्तिमत्त्व-विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.
- डॉ. भूषण शुक्ला, बालमानसरोगतज्ज्ञ

Web Title: Mobile addiction is life threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.