राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कल्याण येथील एका कोचिंग सेंटरमध्ये घुसून संचालकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. संबंधित कोचिंग सेंटरमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण दिले जाते. परंतु, यासाठी विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क आकारले जातात, याबाबत कळताच मनसे कार्यकर्त्यांनी कोचिंग सेंटरमध्ये जाऊन संचालकाला मारहाण केली, अशी माहिती आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
व्हायरल होत असलेल्या दोन मिनिट आणि तीस सेकंदाच्या व्हिडिओमध्ये कोचिंग सेंटरचे संचालक सिद्धार्थ चंदेल एका टेबलासमोर बसून फोनवर बोलत आहेत. तर, त्यांच्यासमोर तीन तरूण बसले आहेत, जे मनसेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला ते सिद्धार्थ चंदेल यांच्याशी वाद घालतात. त्यानंतर अचानक त्यांच्यातील वाद पेटतो आणि एक व्यक्ती सिद्धार्थ चंडेल यांच्या कानशिलात लगावतो. तर, दुसरा व्यक्ती त्यांच्यावर स्टीलची बाटली फेकतो आणि तिसरा व्यक्ती लाकडाची पट्टी फेकून मारतो.