Petition Against Nishikant Dubey In Nashik Maharashtra: भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी पंधरा दिवसांपूर्वी मराठी भाषेबाबत आणि मराठी माणसांबद्दल जे उद्गार काढले की, महाराष्ट्र आमच्या तुकड्यावर जगतो... मराठी माणसाला पटक पटक के मारेंगे..., या विधानांबाबत काही दिवसांपूर्वी निशिकांत दुबे यांना नोटीस बजावली होती. यामध्ये पंधरा दिवसांत मराठी माणसाची माफी मागावी, अशी मागणी आम्ही केली होती. परंतु, या नोटिसीला निशिकांत दुबे यांनी प्रतिसाद दिला नाही. या अनुषंगाने आमच्या वकिलांनी नाशिक न्यायालयात दावा दाखल केला आहे, अशी माहिती मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी दिली.
पहिली इयत्तेपासून हिंदी सक्तीचा मुद्दा, त्याला मनसे, शिवसेना ठाकरे गट तसेच राज्यातील अनेक संस्था संघटना यांनी केलेला विरोध यानंतर मराठी-अमराठी वाद निर्माण झाला. यानंतर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी केलेली अनेक विधाने वादग्रस्त ठरली. याला राज ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिले. यानंतरही निशिकांत दुबे यांना विधाने करण्याचा सिलसिला सुरूच राहिला. यामुळे आता मनसेकडून नाशिक कोर्टात निशिकांत दुबे यांच्याविरोधात याचिका दाखल केला आहे.
तुला धडा शिकवावा लागेल. तू नक्की नाशिकला ये
निशिकांत दुबे सातत्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा अपमान करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना सांगितले की, अशी बेताल वक्तव्ये करू नये. परंतु, हा माणूस थांबायला तयार नाही. म्हणूनच यांना धडा शिकवला गेला पाहिजे. आता आम्ही दुबेला दाखवू की, कसे पटक पटक के मारते हैं. तू नाशिकला ये. त्यांना समजतच नाही की, संपूर्ण देशाची महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी आहे. हा माणूस खासदार असला तरी त्यांना अभ्यास कमी आहे. म्हणून दुबे, तुला धडा शिकवावा लागेल. तू नक्की नाशिकला ये, असे आव्हान मनसे नेते सुदाम कोंबडे यांनी दिले.
दरम्यान, पटक पटक के मारेंगे आणि आप हमारे तुकडों पे पलते हो, ही दोन्ही वाक्ये मराठी माणसासाठी बदनामकारक होती. ... यांनी संपूर्ण मराठी माणसाचे प्रतिनिधित्व घेऊन निशिकांत दुबे यांना नोटीस पाठवली होती. ही वाक्ये मागे घ्यावीत आणि मराठी माणसाची माफी मागावी. यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. ही नोटीस निशिकांत दुबे यांना पोहोचली होती. तशी पोच मिळाली. परंतु, त्यांनी माफी मागितली नाही. त्यामुळे आता नाशिक कोर्टात याचिका दाखल केली होती. भारतीय न्याय संहितेच्या ३५६ कलम, ३५२ कलम अंतर्गत ही याचिका केली आहे. निशिकांत दुबे यांनी आपले दावे कोर्टात सिद्ध करावेत, असे वकील मनोज पिंगळे यांनी म्हटले आहे.