नमस्कार, राज बोलतोय! उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेल्या वृद्ध शिक्षिकेला मनसेप्रमुखांचा फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 13:17 IST2021-05-27T13:13:58+5:302021-05-27T13:17:06+5:30
मनसे प्रमुख राज ठाकरेंचा त्यांच्या माजी शिक्षिका सुमन रणदिवेंना फोन; आवश्यक मदत पूर्ण करण्याचं आश्वासन

नमस्कार, राज बोलतोय! उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेल्या वृद्ध शिक्षिकेला मनसेप्रमुखांचा फोन
वसई: तौत्के चक्रीवादळचा पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला. यात समुद्र किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वसई येथील एका वृद्धाश्रमालाही वादळाचा फटका बसला. न्यू लाइफ फाऊंडेशनच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीचा दरवाजा कोसळून एक वृद्ध नागरिक जखमी देखील झाला. विशेष बाब अशी की या वृद्धाश्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना शालेय शिक्षण दिलेले शिक्षकही राहत आहेत.
सुमन लक्ष्मीकांत रणदिवे (८८) या दादरच्या बालमोहन विद्या मंदिरात गणित आणि विज्ञान विषयाच्या शिक्षिका होत्या. १९९१ साली त्या निवृत्त झाल्या. गेल्या वर्षभरापासून त्या वसईतील न्यू लाइफ फाऊंडेशनच्या वृद्धाश्रमात राहत आहेत. वादळामुळे वृद्धाश्रमाची वास्तू मोडकळीस आली आहे आणि इथल्या अपुऱ्या सुविधांमुळे वृद्धांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सुमन रणदिवे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा करत मदतीसाठी आर्जव केलं. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुमन यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
"उद्धव बेटा, मला तुला भेटायचंय", मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिकेचं आर्जव; तौत्के वादळानं वृद्धाश्रम मोडकळीस
राज ठाकरेंना फोनवरून नमस्कार करताच सुमन यांनी त्यांच्याकडे आपलं गाऱ्हाणं माडलं. 'वादळामुळे खूप मोठं नुकसान झालंय. जास्तीत जास्त मदत कर,' अशी विनंती सुमन रणदिवे यांनी केली. त्यावर मी अविनाश जाधव यांना सांगितलं आहे. ते नक्की मदत करतील. तुम्ही काळजी करू नका, असं आश्वासन राज यांनी दिलं. यावेळी कुंदा कशी आहे, अशी विचारणा रणदिवेंनी केली. त्यावर आई बरी आहे असं उत्तर राज यांनी दिलं.
तू मध्यंतरी इथे आला होतास. पण आपली भेट झाली नाही. एकदा मला भेटायला ये ना, असं म्हणत रणदिवेंनी राज यांच्याकडे भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर लॉकडाऊन संपू दे. नक्की भेटायला येतो, असा शब्द राज यांनी रणदिवे यांना दिला. तब्येत ठिक आहे ना, अशी विचारपूस राज यांनी केली. रणदिवे यांनीदेखील राज आणि त्यांच्या कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.