Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळाचा मुहूर्त ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र किती मंत्र्यांचा शपथविधी होणार कोणाला किती मंत्रीपदे मिळणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र पक्षाच्या नेतृत्वांकडून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रीपदासाठी फोन जाण्यास सुरुवात झाली आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे १२ आमदार आज शपथ घेणार असल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रीमंडळाचा शपथविधी आज पार पडणार आहे. नागपूरच्या राजभवनमध्ये दुपारी ४ वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. यामध्ये ३० ते ३२ मंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. भाजपमधील काही ज्येष्ठ मंत्र्यांऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे म्हटलं जात आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून पाच जुन्या तर सात नवी चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे, अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली. यावेळी भरत गोगावले यांच्याही गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार आहे.
गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, आशिष जैस्वाल, प्रकाश आबिटकर, योगेश कदम, दादा भुसे, उदय सामंत यांच्या नावाचा उल्लेख आमदार भरत गोगावले यांनी केला. कदाचित संजय राठोड यांनाही मंत्रीपद मिळू शकतं असं गोगावले यांनी म्हटलं. १२ आमदारांना फोन गेल्याची माहिती भरत गोगावले यांनी दिली आहे.
दरम्यान, गृहनिर्माण आणि पर्यटन अशी दोन खाती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असण्याची शक्यता आहे. गेले काही दिवसा शिवसेना गृहमंत्रीपदासाठी आग्रही होती. मात्र भाजपने या मागणीला स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे आता भाजप गृहमंत्रीपद कोणाकडे सोपावणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.