आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 06:46 IST2025-12-23T06:45:55+5:302025-12-23T06:46:11+5:30
मुंबईत महायुतीत अजित पवार गटाला सोबत घ्यायचे की नाही यावरून घोळ सुरू आहे, तर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरी उद्धवसेना त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न करीत आहे.

आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निकालानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे मिशन महापालिका सुरू झाले आहे. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मंगळवार, २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. त्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये एकत्र लढायचे की स्वतंत्र यावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे.
मुंबईत महायुतीत अजित पवार गटाला सोबत घ्यायचे की नाही यावरून घोळ सुरू आहे, तर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरी
उद्धवसेना त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न करीत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांसह इतर पालिकांमध्ये युती-आघाडीबाबत अद्याप स्पष्टता नाही. काही ठिकाणी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर युती-आघाडीच्या घोषणेची शक्यता आहे.
महापौरपदाची सोडत बाकी
महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असली तरी महापौरपदाची सोडत अद्याप बाकी आहे. ही सोडत निघाल्यानंतर कोणत्या महापालिकेतील महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी असणार आणि कोणत्या महापालिकेतील महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित असणार हे स्पष्ट होणार आहे.
अपक्षाची नावे शेवटी
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ईव्हीएमवर आधी राष्ट्रीय मान्यताप्राप्त आणि राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांची नावे असतील. अपक्ष उमेदवारांची नावे सर्वात शेवटी असतील.
उमेदवारी अर्ज ऑफलाइन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु, विविध राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेऊन महापालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाइन पद्धतीनेच उमेदवारी दाखल करता येतील.
असा आहे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम
अर्ज भरण्यास प्रारंभ :
२३ डिसेंबरपासून
अर्ज भरण्याची अंतिम मुदत :
३० डिसेंबर
अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर
अर्ज मागे घेण्याची मुदत :
२ जानेवारी २०२६
चिन्हवाटप व उमेदवारांची अंतिम यादी : ३ जानेवारी २०२६
मतदान : १५ जानेवारी २०२६
मतमोजणी : १६ जानेवारी २०२६