अल्पसंख्याकांची शिष्यवृत्ती हरवली

By Admin | Updated: November 19, 2014 04:55 IST2014-11-19T04:55:34+5:302014-11-19T04:55:34+5:30

अभियांत्रिकी संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ‘एमसीएम’ शिष्यवृत्तीवरून संभ्रम निर्माण झाला आहे.

Minority scholarships are lost | अल्पसंख्याकांची शिष्यवृत्ती हरवली

अल्पसंख्याकांची शिष्यवृत्ती हरवली

योगेश पांडे, नागपूर
अभियांत्रिकी संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ‘एमसीएम’ शिष्यवृत्तीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकारकडून २०१३-१४ या वर्षीसाठीच्या शिष्यवृत्तीचा निधी देण्यात आला असतानादेखील विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप रक्कम आलेली नाही. ८ महिन्यांपासून सातत्याने शासन दरबारी पायपीट करून याचे नेमके कारण दिले जात नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. केंद्र सरकारने शिष्यवृत्तीची रक्कम दिली असली तरी ती अद्याप ‘डीटीई’पर्यंत (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) पोहोचली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अशा स्थितीत ही रक्कम नेमकी हरवली कुठे, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
शिक्षणाचा प्रत्येकाचा हक्क जोपासण्यासाठी केंद्र शासनाकडून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना ‘एमसीएम’ (मेरीट कम मिन्स) शिष्यवृत्ती देण्यात येते. प्रति विद्यार्थी २५ हजार रुपये किंवा ३० हजार रुपये (वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी) अशी ही रक्कम आहे. या शिष्यवृत्तीकरिता संबंधित पात्र विद्यार्थ्यांना
‘आॅनलाईन’ पद्धतीने अर्ज करावा लागतो. २०१३-१४ या वर्षाकरिता राज्यातील अनेक संस्थांतील विद्यार्थ्यांनी ‘डीटीई’ने जारी
केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. यातील पात्र विद्यार्थ्यांची सूची ‘डीटीई’कडून केंद्राकडे पाठविण्यात येते व त्यानंतर याला अंतिम मंजुरी देऊन केंद्राकडून राज्य शासनाकडे ती देण्यात येते व ‘डीटीई’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रक्कम वाटण्यात येते.
परंतु २०१३-१४ या वर्षाकरीता अर्ज केल्यानंतर ८ ते १२ महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. परंतु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत चौकशी केली असता त्यांना ‘डीटीई’कडे पाठविण्यात आले. ‘डीटीई’च्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात हात वर करत योग्य माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे नेमकी दाद मागावी कुठे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे.
यासंदर्भात नागपूर विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांना विचारणा केली असता विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या असल्याची बाब त्यांनी मान्य केली. परंतु यासंदर्भात संचालकच योग्य माहिती देऊ शकतील, असे ते म्हणाले.
‘डीटीई’चे संचालक डॉ. सुभाष महाजन यांच्याशी संपर्क केला असता शिष्यवृत्ती देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु इतका उशीर का झाला याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला़

Web Title: Minority scholarships are lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.