मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांची पाठराखण
By Admin | Updated: April 1, 2015 02:16 IST2015-04-01T02:16:47+5:302015-04-01T02:16:47+5:30
मुंबईतील मजासवाडी येथील सर्वोदयनगर गृहनिर्माण सोसायटीमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या योजनेतील वादासंदर्भात गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर

मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांची पाठराखण
मुंबई : मुंबईतील मजासवाडी येथील सर्वोदयनगर गृहनिर्माण सोसायटीमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या योजनेतील वादासंदर्भात गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडे सर्व संबंधितांची बैठक बोलावण्यास विद्या चव्हाण यांनी मंगळवारी विधान परिषदेत विरोध केला. तालिका सभापती प्रकाश बिनसाळे यांनीही मुख्यमंत्री अथवा गृहनिर्माण मंत्र्यांकडे बैठक घेण्याचे निर्देश दिले. मात्र गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी वायकर यांची पाठराखण करीत बैठक त्यांच्याकडेच होईल, असे ठाम प्रतिपादन केले.
विद्या चव्हाण यांनी याबाबत लक्षवेधी सूचना दाखल केली होती. यावर बोलताना चव्हाण यांनी वायकर यांनी आमदार असताना लिहिलेल्या एका पत्राचा संदर्भ देत ते सर्वोदयनगरातील रहिवाशांना न्याय देऊ शकणार नाहीत, असे मत व्यक्त केले. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी चव्हाण यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला. कॅबिनेट मंत्र्यांकडेच बैठक झाली पाहिजे असा आग्रह धरणे योग्य नाही, असे कदम म्हणाले. तालिका सभापती प्रकाश बिनसाळे म्हणाले की, हा प्रश्न वायकर यांच्या मतदारसंघातील असल्याने कॅबिनेट मंत्र्यांकडेच बैठक होणे चांगले होईल. राज्यमंत्री वायकर हे त्या बैठकीला हजर राहतील. त्यांच्यावर आरोप करण्याची संधी कुणालाही मिळू नये, याकरिता आपण हे निर्देश देत आहोत. मात्र गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी बैठक राज्यमंत्री वायकर यांच्याकडेच होईल आणि जर त्या बैठकीत अन्यायकारक निर्णय झाला असे वाटले तर तुम्ही दाद मागू शकता. परंतु राज्यव्यवस्थेवर असा अविश्वास दाखवू नका, असेही महेता म्हणाले.
तत्पूर्वी विद्या चव्हाण म्हणाल्या की, ९३० चौ.फुटांचे घर देतो सांगून सर्वोदयनगरातील रहिवाशांची बिल्डरने फसवणूक केली आहे. शिवाय हे म्हाडाचे रहिवासी असताना त्यांना झोपडपट्टीवासीय असल्याचे भासवले जात असल्याचे त्या म्हणाल्या. राज्यमंत्री वायकर म्हणाले की, २००९ मध्ये एकूण २२ सोसायट्यांपैकी १९ सोसायट्यांनी जे. के. इन्फ्रास्ट्रक्चर्स या बिल्डरला संमतीपत्रे दिली. ३ सोसायट्यांमधील रहिवासी योजनेत सहभागी झाले नाहीत. त्यानंतर ५७९ रहिवाशांपैकी १०३ रहिवाशांनी बिल्डरशी असहकार केला. एकूण ५३४ लोकांनी संमतीपत्रे दिली असून, ४२४ लोकांनी घरे रिकामी केली आहेत तर ५५५ लोकांनी अजून घरे सोडलेली नाहीत.
सध्या तेथे चार मजली इमारतीचे काम सुरू आहे. सर्वोदयनगरातील रहिवाशांच्या ‘सर्वोदयनगर बचाव समिती’शी विधिमंडळ अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन चर्चा करण्याची मागणी भाई जगताप यांनी केली आणि ती वायकर यांनी मान्य
केली. (विशेष प्रतिनिधी)