मुंबई महापालिकेच्या 175 शाळांमध्ये सुरू होणार मिनी सायन्स सेंटर
By Admin | Updated: March 21, 2017 14:56 IST2017-03-21T14:56:11+5:302017-03-21T14:56:11+5:30
मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी पालिकेच्या तब्बल 175 शाळांमध्ये मिनी सायन्स सेंटर उभारण्याची मान्यता दिली आहे

मुंबई महापालिकेच्या 175 शाळांमध्ये सुरू होणार मिनी सायन्स सेंटर
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - विज्ञान आणि गणित हे खरंतर अत्यंत सोपे आणि मुलांच्या मनात कुतुहल जागृत करणारे विषय असूनही अनेकदा शिकविण्याच्या किचकट पध्दतीमुळे विद्यार्थ्यांना ते नकोसे वाटतात. परंतु जर का मुलांना लहान वयातच वेगवेगळ्या प्रयोगांच्या संधी उपलब्ध करून देवून या विषयांची गोडी लावली तर त्यातून पुढच्या पिढीतील शास्त्रज्ञ नक्कीच घडू शकतात. किमान विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टीकोन तरी निश्चितच निर्माण होवू शकतो. हाच दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी पालिकेच्या तब्बल 175 शाळांमध्ये मिनी सायन्स सेंटर उभारण्याची मान्यता दिली होती. हे काम मुंबईच्या स्टेम लर्निंग कंपनीच्या सहयोगाने सध्या सुरू असून या 175 शाळांमध्ये लवकरच प्रत्यक्ष मिनी सायन्स सेंटर सुरू केली जाणार आहेत.
तत्त्पुर्वी या मिनी सायन्स सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोप्यातसोप्या पध्दतीने विज्ञान विषयात कशा प्रकारे रूची निर्माण करावी याचे प्रशिक्षण पालिकेच्या विज्ञान शिक्षकांना देणे सध्या सुरू आहे. हे प्रशिक्षण सेंट्रल विभागात घाटकोपर येथील जयंतीलाल हिंद हायस्कूल, वेस्टर्न विभागात विलेपार्ले येथील एमएनपी स्कूल संकुल आणि मुंबई शहरात भायखळा येथील साध्वी सावित्रीबाई स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये महापालिकेच्या शाळांचे 150 हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. याशिवाय या प्रशिक्षणादरम्यान उपस्थित राहू न शकणाऱ्या शिक्षकांना बुधवारी 22 मार्चला प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यापूर्वी ही सीएसआरच्या माध्यमातून जेएसडब्ल्यू स्टील कंपनी आणि स्टेम लर्निंगच्या सहाय्याने महापालिकेच्या 25 शाळांमध्ये मिनी सायन्स सेंटर चालविले जात आहेत. या मिनी सेंटरमध्ये तब्बल साठ छोट्या मोठ्या प्रयोगांचे मॉडेल्स् ठेवण्यात येतात. या उपक्रमाअंतर्गत स्टेम लर्निंगने लघु विज्ञान केंद्रे स्थापन करून मॉडेल डिझायनिंगच्या स्पर्धाचेही आयोजन करते. याशिवाय या माध्यमातूनच शास्त्रज्ञांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रयोगांविषयी नवचेतना जागृत करण्याचे काम करण्यात येतेच परंतु विद्यार्थ्यांना थेट प्रसिध्द शास्त्रज्ञांशी संवाद ही या माध्यमातून साधता येतो. विद्यार्थ्यांना प्रयोग सोप्या आणि सुलभ माध्यमातून समजावेत म्हणून शिक्षकांना ही मॉडेल्स हाताळण्याचे आणि जटिल प्रयोग सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचे प्रशिक्षण देण्यात येते असल्याचे स्टेम लर्निंगचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष पंडित यांनी या उपक्रमाबाबत सांगितले.
पृथ्वी गोल आहे तर मग ती फिरताना आपण उलटे का नाही होतं, भिष्मांना खिळ्यांवरती ठेवलं असतानाही ते कसे जीवंत राहू शकले किंवा माणूस पक्षांप्रमाणे मान का फिरवू शकत नाही असे सोपे सोपेच वाटणारे परंतु त्यांचा विचार करायला लावणारे प्रश्न हे मुलांना नेहमीच पडत असतात. पण त्यांची उत्तरे वैज्ञानिक दृष्ट्या देण्यास पालकांबरोबरच शिक्षक ही बऱ्याचदा कमी पडतात. असे अनेक प्रश्न स्टेमच्या मिनी सायन्स प्रयोगशाळांच्या माध्यमातून साध्या साधनांनी सोप्या आणि सहज पध्दतीने उलगडण्याचा करण्याचा प्रयत्न केला असून छोट्या छोट्याच पण दैनंदिन आयुष्यावर प्रभाव करणाऱ्या गोष्टी विज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करून समझावण्याचा प्रयत्न ही या मिनी सायन्स सेंटरच्या माध्यमातून केले जात असल्याची प्रतिक्रिया घाटकोपर येथील जयंतीलाल हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र यादव यांनी व्यक्त केली.