एमआयएम उतरणार विधानसभेच्या आखाडय़ात
By Admin | Updated: July 26, 2014 01:41 IST2014-07-26T01:41:20+5:302014-07-26T01:41:20+5:30
प्रक्षोभक भाजणबाजी आणि आक्रस्ताळ्या राजकारणासाठी प्रसिध्द असणारी हैद्राबाद येथील मजलिसे इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएम) हा पक्ष महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लढविणार

एमआयएम उतरणार विधानसभेच्या आखाडय़ात
गौरीशंकर घाळे - मुंबई
प्रक्षोभक भाजणबाजी आणि आक्रस्ताळ्या राजकारणासाठी प्रसिध्द असणारी हैद्राबाद येथील मजलिसे इत्तेहादूल मुसलमीन (एमआयएम) हा पक्ष महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लढविणार असून मुंबईतही उमेदवार आपले उभे करणार आहे. एमआयएमबाबत मुस्लिम समाजात असणा-या आकर्षण पाहता राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसाठी ही धोक्याची सूचना मानण्यात येत आहे.
एमआयएम महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत आपले उमेदवार उभे करणार आहे. नेमक्या किती जागा लढविणार याबाबत आताच काही सांगता येणार नाही. मात्र राज्यतील निवडक जागांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात येणार आहे. मुंबई, ठाणो, जालना, बीड, औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्यांचा यात समावेश असल्याची माहिती एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी दिली. यासंदर्भात ओवेसी यांनी मुंब्रा आणि मुंबईतील पदाधिकारी व कार्यकत्र्याची भेट घेत याबाबत चर्चा केली.
आक्षेपार्ह विधानामुळे ओवेसी काही काळ तुरुंगात होते. सध्या त्यांना राज्यात सभा आणि भाषणबंदी करण्यात आलेली आहे. ओवेसी यांना मुंब्रा आणि मुंबईतील हज हाऊस येथे इफ्तार पार्टी आयोजित करण्यात परवानगी नाकारण्यात आल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. एमआयएमच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे घाबरलेल्या सत्ताधा-यांनी ही खेळी केल्याचा आरोप ओवेसी यांनी लगावला. नांदेड महापालिकेत एमआयएमचे नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीदरम्यान एमआयएमने राज्यात उमेदवार दिले नव्हते. नवनिर्मित तेलंगणा राज्यात लोकसभेसोबतच विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यात आल्या. यासाठी महाराष्ट्रात लोकसभा न लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, विधानसभा निवडणुकांदरम्यान अशी अडचण नसल्याने एमआयएम राज्याच्या राजकीय आखाडय़ात उतरण्याच्या तयारीत असून कॉंग्रेस-राष्ट्रवादी समोर आपला परंपरागत मतदार राखण्याचे आव्हान असणार आहे. (प्रतिनिधी)