‘एमआयएम’ची नोंदणी रद्द !
By Admin | Updated: July 14, 2016 04:11 IST2016-07-14T04:11:10+5:302016-07-14T04:11:10+5:30
आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न केल्याने निवडणूक आयोगाने ओवैसी बंधूंच्या आॅल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची नोंदणी रद्द केली आहे

‘एमआयएम’ची नोंदणी रद्द !
मुंबई : आयकर विवरणपत्राची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत सादर न केल्याने निवडणूक आयोगाने ओवैसी बंधूंच्या आॅल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाची नोंदणी रद्द केली आहे. त्यामुळे या पक्षाला फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेसह कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवता येणार नाही. शिवाय, १९१ अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांनादेखील असाच फटका बसला आहे.
निवडणूक आयोगाकडे एकूण ३५९ राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. त्यात १७ मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचा समावेश असून उर्वरित सर्व ३४२ अमान्यताप्राप्त आहेत. या पक्षांना आयकर विवरणपत्र भरल्याची व लेखा परीक्षण लेख्याची प्रत दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे; परंतु ती सादर न केल्यामुळे ३२६ राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतरही मुदतीत संबंधित कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे १९१ पक्षांची नोंदणी
रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आम्ही अपील दाखल करणार असल्याची माहिती एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनी दिली. बुधवारी आयोगाने पक्षाची मान्यता रद्द केल्यानंतर आ. जलील यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले.
यामध्ये जलील यांनी नमूद केले की, आयोगाला हवी असलेली सर्व कागदपत्रे आमच्या हैदराबाद येथील टीमने सादर केली होती. त्यानंतरही पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आदर करीत पुन्हा आयोगाकडेच अपील दाखल करणार आहोत. आगामी महापालिका निवडणुका पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याला आयोगाचे प्राधान्य असते. निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेल्या राजकीय पक्षास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी चिन्ह वाटपात प्राधान्य दिले जाते.
नोंदणी रद्द केलेले राजकीय पक्ष
मुंबईतील २८, ठाणे/पालघरचे १५, रायगडचे ४, सिंधुदुर्ग १, नाशिकचे ८, जळगावचे १६, नंदुरबारचे २, अहमदनगरचे २०, पुण्याचे १४, सोलापूरचे ७, साताऱ्याचे ११, सांगलीचे ८, कोल्हापूरचे ७, औरंगाबादचे ७, बीडचे ३, नांदेडचे ३, जालना, लातूर २, अमरावतीचे २, अकोल्याचे २, यवतमाळचे ३, बुलडाण्याचे ५, नागपूरचे १२, वर्ध्याचे २, गोंदियाचे २ यांचा समावेश आहे.