अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 23:51 IST2025-06-04T23:51:03+5:302025-06-04T23:51:40+5:30
धारणी तालुक्यातील शिवझिरी हे भूकंपाचे केंद्र असल्याचे ‘एनसीएस’च्या रिपोर्टमध्ये नमूद आहे

अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
अमरावती : धारणी तालुक्यातील काही गावांमध्ये बुधवारी रात्री ९.५८ वाजता ३.८ रिक्टर स्केलचा सौम्य स्वरुपाचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्रांत झालेली आहे. प्रत्यक्षात या गावांमधील नागरिकांना कुठल्याही स्वरुपाचे धक्के जाणवले नसल्याची माहिती धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली
धारणी तालुक्यातील शिवझिरी हे भूकंपाचे केंद्र असल्याचे ‘एनसीएस’च्या रिपोर्टमध्ये नमूद आहे व यालगतच्या सुसर्दा, राणीगाव, डाबला, नारदू या गावांच्या परिसरात सौम्य स्वरुपाचा भूकंप झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी दिली. त्यांनी याबाबत धारणी तहसीलदारांना याबाबत माहिती दिली व या गावांमध्ये तलाठी, मंडळ अधिकारी यांची चमू पाठविण्यात आली. शिवाय तहसीलदार शेवाळे यांनी या गावांमधील काही नागरिकांशी संपर्क केला असता, कुठल्याही स्वरुपाचा धक्का जाणवला नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अप्पर वर्धा धरणावरील भूकंपमापक यंत्र कित्येक वर्षांपासून बंद आहे. या यंत्राची दुरुस्ती अद्याप करण्यात आलेली नसल्याचे वास्तव आहे.
गतवर्षी ४.२ रिरिक्टर स्केलचा भूकंप
गतवर्षी ३० सप्टेंबर २०२४ रोजी, अमरावती जिल्ह्यात ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू चिखलदरा तालुक्यातील अमझरी आणि टेटू गावांच्या दरम्यान होता. या भूकंपामुळे त्यावेळी कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.