मिहान घेणार भरारी
By Admin | Updated: November 5, 2014 00:51 IST2014-11-05T00:51:46+5:302014-11-05T00:51:46+5:30
विदर्भाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता असलेला मिहान प्रकल्प ज्या कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून रखडला होता, त्याला मुख्यमंत्री यांनी केलेल्या विविध घोषणांमुळे पुढच्या काळात

मिहान घेणार भरारी
मुख्यमंत्र्यांच्या घोषणांमुळे उद्योजकांमध्ये विश्वास : नव्या कंपन्या येणार
मोरेश्वर मानापुरे - नागपूर
विदर्भाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता असलेला मिहान प्रकल्प ज्या कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून रखडला होता, त्याला मुख्यमंत्री यांनी केलेल्या विविध घोषणांमुळे पुढच्या काळात चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे महागड्या विजेमुळे जे उद्योजक आपला प्रकल्प सुरू करण्यास इच्छुक नव्हते त्यांच्यासाठी स्वस्त दरातील वीज पुरवठा ही मुख्यमंत्र्यांची घोषणा संजीवनी देणारी आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांमुळे फक्त उद्योजकांनाच दिलासा मिळेल, असे नव्हे तर प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्पबाधित कुटुंबातील तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांनी मिहान विकासाचा कालबद्ध कार्यक्रम दिला आहे आणि ते स्वत: मिहानच्या समस्यांशी परिचित असल्याने त्यांचा यासाठी सातत्याने पाठपुरावा राहणार आहे. हा विश्वास उद्योजक आणि प्रकल्पग्रस्त यांच्या मनात निर्माण झाला आहे. मिहानसाठी ही सर्वात महत्त्वपूर्ण बाब आहे. मिहानचा खडान्खडा माहिती असणारे आणि हा प्रकल्प क्रियान्वित व्हावा, अशी मनापासूनची इच्छा असणारे नागपूरचे दोन बडे नेते केंद्रात व राज्यात मोठ्या हुद्यावर आहेत. त्याचाही फायदा या प्रकल्पाच्या विकासासाठी होणार आहे.
विजेच्या दरनिश्चितीने कंपन्यांमध्ये उत्साह
विजेच्या दरनिश्चितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कंपन्यांमध्ये उत्साह असून, अनेक नवीन कंपन्यांनी मिहान आणि एसईझेडमध्ये उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. ४ ते ४.५० रुपये दर उद्योगांना दिलासा देणारा आहे. ६६ कंपन्यांनी जागा विकत घेतली असून, सध्या २२ कंपन्या कार्यरत आहेत. बहुतांश सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. टीसीएस कंपनीची भरती सुरू आहे. ज्यांनी उद्योग सुरू केलेले नाहीत, त्यावर एमएडीसीने कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. वेळ लागेल, पण नवीन उद्योगांना जागा मिळेल. निर्यातदार नसलेल्या उद्योगाला लोकलमध्ये माल विकता येणार नाही. स्थानिक बाजारपेठेत माल विकण्यासाठी आयात कराचे निर्बंध नसावेत. त्यासाठी एसईझेड पॉलिसीत सुधारणा करण्याची गरज आहे. सूचना पाठविल्या आहेत. लवकरच घोषणा होणाऱ्या नवीन विदेशी व्यापार धोरणात याचा समावेश राहील. एमएटी आणि एएमटी १८ टक्क्यांची तरतूद रद्द करण्याची मागणी आहे. निर्यातदारांना स्थानिक बाजारात माल विकण्याची परवानगी दिल्यास, पूर्ण क्षमतेने मालाचे उत्पादन होईल आणि मिहान पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर येईल, असा विश्वास मिहान इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर भोजवानी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. छोट्या कंपन्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून नेट फॉरेन एक्सचेंज सकारात्मक असावे. नवीन युनिटला आयातीची सवलत पाच वर्षांवरून आठ वर्षे करावी, असे भोजवानी यांनी स्पष्ट केले.
एसईझेडमध्ये कार्यरत कंपन्या
क्लाऊड डाटा लॅब प्रा.लि., कानव अॅग्रोनॉमी, सिनोस्पेअर इंडिया प्रा.लि., स्मार्ट डाटा (इं.) लि., डायट फूड इंटरनॅशनल, मेटा टेक एअर सिस्टीम, इबिक्स सॉफ्टवेअर, ल्युपिन लिमिटेड, कॅलिबर पॉर्इंट बिझनेस सोल्युशन, परवेश एक्स्पोर्ट प्रा.लि., टेक महिन्द्र, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, जेनटेक इंजिनिअरिंग, लिपी इंटरनॅशनल, महिन्द्र सत्यम, हल्दीराम इंटरनॅशनल.