मध्यमवयीन व्यक्तीला मिळाले ‘तरुण हृदय’
By Admin | Updated: April 27, 2016 11:17 IST2016-04-27T06:25:57+5:302016-04-27T11:17:56+5:30
हृदयाचा दुर्धर आजार असणाऱ्या राजस्थानातील ४३ वर्षीय पुरुषास उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आले होते.

मध्यमवयीन व्यक्तीला मिळाले ‘तरुण हृदय’
मुंबई : हृदयाचा दुर्धर आजार असणाऱ्या राजस्थानातील ४३ वर्षीय पुरुषास उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीला सुरतमधील १७ वर्षीय तरुणाचे हृदय मिळाल्याने जीवनदान मिळाले आहे. सुरत ते मुंबई हे २९६ किमीचे अंतर अवघ्या १ तास १५ मिनिटांत कापून हृदय मुंबईत आणण्यात आले.
राजस्थानातील अल्वर येथे राहणाऱ्या ४३ वर्षीय पुरुषास डायलेटेड कार्डिओमायोपॅथी हा आजार झाला होता. या आजारात हृदयाच्या धमण्या घट्ट होतात. त्यामुळे हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळे निर्माण होतात. या आजारावर शेवटचा उपचार म्हणजे हृदय प्रत्यारोपण हा असतो. या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी उपचारासाठी मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सुरतच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल झालेल्या १७ वर्षीय तरुणाचा अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्या वेळी त्याच्या नातेवाइकांनी हृदय, मूत्रपिंड आणि यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चार जणांना जीवनदान मिळाले आहे. मुंबईत आणल्या गेलेल्या हृदयामुळे या ४३ वर्षीय पुरुषास जीवनदान मिळाले आहे.
चांगल्या प्रकारे सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होत आहे. त्यामुळे अवयवदानाचा टक्का वाढतो आहे. अशाच पद्धतीने अवयवदान होत राहिल्यास गरजूंना त्याचा नक्कीच फायदा होईल. अवयवदात्यांच्या कुटुंबाचे कौतुक केले पाहिजे. हृदय प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तीची प्रकृती आता स्थिर आहे. त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. पुढचे ४८ ते ७२ तास त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती हृदय शल्यविशारद डॉ. अन्वय मुळे यांनी दिली. (प्रतिनिधी)
>हृदयाचा प्रवास!
मंगळवार, २६ एप्रिलला सकाळी १०.३३ वाजता सुरतच्या रुग्णालयातून डॉक्टर हृदय घेऊन निघाले. १०.३८ ला हृदय घेऊन डॉक्टर सुरतच्या विमानतळावर पोहोचले. १०.४१ वाजता सुरत विमानतळावरून चार्टर्ड फ्लाइट निघाले आणि ११.२० वाजता मुंबई विमानतळावर पोहोचले. ११.३१ वाजता रुग्णवाहिका विमानतळावरून निघाली आणि ११.४७ वा. रुग्णालयात पोहोचली.