देशात मध्यावधी निवडणुका होणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 21:24 IST2025-09-03T21:23:23+5:302025-09-03T21:24:27+5:30

काँग्रेसने आज नागपुरात 'वोट चोर, गद्दी छोड' असा भव्य मेळावा घेतला. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे.

Mid-term elections will be held in the country; Congress state president Harshvardhan Sapkal claims | देशात मध्यावधी निवडणुका होणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा

देशात मध्यावधी निवडणुका होणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा

देशातील लोकशाही आणि संविधानाला भाजपमुळे धोका निर्माण झाला असून, भाजपने मतांची चोरी करून सत्ता मिळवली आहे, असा आरोप करत काँग्रेसने आज नागपुरात 'वोट चोर, गद्दी छोड' असा भव्य मेळावा घेतला. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाखालची वाळू सरकली असून, देशात कोणत्याही क्षणी मध्यावधी निवडणुका लागतील, असे सपकाळ म्हणाले.

'लोकशाहीला हात लावणाऱ्या भाजप सरकारला हा एक इशारा आहे. ज्या नागपूरमधून ७५ वर्षांच्या नेत्यांना खुर्ची खाली करण्याचे आदेश निघाले आहेत, त्यामुळे मोदींच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तो दिवस दूर नाही, जेव्हा देशात मध्यावधी निवडणुका होतील आणि शिव, शाहू, फुले व आंबेडकरांच्या विचारांचे नवे सरकार येईल,' असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. 

भाजपने १३२ आमदार चोरून निवडून आणले!
याच मेळाव्यात बोलताना विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, 'भाजपने मतांची चोरी करून महाराष्ट्रात १३२ आमदार निवडून आणले आहेत. हे लोक घाबरट आहेत. मतांची चोरी करून सत्तेत आले आहेत. आता मतदारच या मतचोरांना शिक्षा देतील.'

निवडणूक आयोग भाजपच्या इशार्‍यावर चालतो?
माजी मंत्री नसीम खान यांनी थेट निवडणूक आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'लोकसभेत 'महाविकास आघाडी'ला मोठे यश मिळाले, पण पाच महिन्यांतच चित्र बदलले. निवडणूक आयोगाने ४५ लाख मतदार वाढवले. निवडणूक आयोग भाजपच्या इशार्यावर काम करत आहे, आणि राहुल गांधी यांनी आवाज उठवूनही आयोग समाधानकारक उत्तर देत नाही.'

या भव्य मेळाव्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह इतर नेत्यांनीही मतचोरीच्या मुद्द्यावर भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका केली. लोकशाही आणि संविधानावर होणारा हा हल्ला हाणून पाडला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Mid-term elections will be held in the country; Congress state president Harshvardhan Sapkal claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.