मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सध्या राज्यभरातील मंडळांतर्गत येणाऱ्या घरांच्या सोडती (लॉटरी) म्हाडा प्राधिकरणाला घोषित करता येत नसल्या तरी म्हाडाने नव्या वर्षात या सोडतींसाठी तयारी केली आहे. त्यात मुंबई, कोकण आणि पुणे मंडळाच्या सोडतींचा समावेश असून, आचारसंहिताचा संपताच सोडतीच्या प्रक्रियेला वेग येईल, अशी माहिती म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
म्हाडाने मुंबईसह राज्यभरातील घरबांधणीचे २०३० पर्यंतचे नियोजनदेखील केले आहे. एमएमआर ग्रोथ हबमध्ये आठ लाख घरांचे उद्दिष्ट आहे. कोकण मंडळाच्या सुमारे दोन हजार घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन आहे. ‘प्रथम येणाऱ्याला प्राधान्य’ या योजनेमधील १२५ घरांच्या विक्रीसाठीही काम सुरू आहे. तर मुंबई मंडळाच्या घरांची संख्या किती असेल? हे अधिकाऱ्यांनी सांगण्यास नकार दिला. कोकण मंडळाच्या सोडतीत प्रत्यक्षात संबंधित ठिकाणी पायाभूत सेवा-सुविधा नसल्याने ग्राहक म्हाडाला घरे परत करत असल्याचे चित्र आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्या ठिकाणीही पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्यासाठी प्राधिकरण सरसावले आहे.
सहा लाख नवीन घरे बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्प, मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प, जी.टी.बी. नगर येथील पंजाबी कॉलनी, पत्राचाळ, अभ्युदय नगर, जोगेश्वरीतील पूनम नगर, अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर, वरळीतील आदर्श नगर आणि वांद्रे रिक्लेमेशन पुनर्विकास प्रकल्प हे प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात आहेत. या प्रकल्पांमुळे घरांच्या साठ्यात सुमारे सहा लाख नवीन घरे जोडली जातील.