राजकीय नेत्यांच्या आठवणीत रंगलेला सोहळा
By Admin | Updated: September 4, 2014 00:54 IST2014-09-04T00:54:48+5:302014-09-04T00:54:48+5:30
माजी पंतप्रधान नरसिंहराव, माजी केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण, मोहन धारिया, वसंतराव साठे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या आठवणींनी एक सोहळा आज रंगला. सर्व वृत्तपत्रांचे संपादक आणि शहरातील

राजकीय नेत्यांच्या आठवणीत रंगलेला सोहळा
राम खांडेकर यांचा सत्कार : विदर्भ गौरव प्रतिष्ठानचा उपक्रम
नागपूर : माजी पंतप्रधान नरसिंहराव, माजी केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण, मोहन धारिया, वसंतराव साठे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या आठवणींनी एक सोहळा आज रंगला. सर्व वृत्तपत्रांचे संपादक आणि शहरातील निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत दिग्गज नेत्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. बरेचदा मोठ्या पदावर असलेल्या नेत्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यातून मार्ग काढताना मनस्ताप सहन करावा लागतो. राजकीय क्षेत्रात ताणतणावात जगतानाही यशवंतराव आणि नरसिंहराव यांच्यातील संवेदनशील माणूसही या कार्यक्रमात अनुभवता आला.
विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्यावतीने माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे स्वीय सचिव राहिलेल्या रामचंद्र केशवराव खांडेकर यांचा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. शहरातील निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा छोटेखानी सत्कार समारंभ वनराईच्या, शंकरनगर येथील सभागृहात माजी खा. दत्ता मेघे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला. याप्रसंगी राम खांडेकर आणि त्यांच्या पत्नी स्नेहलता खांडेकर यांना शाल, श्रीफळ आणि साडीचोळी प्रदान करण्यात आली.
मोठमोठ्या पदांवर राम खांडेकर यांनी कार्य केले पण त्यांच्या पत्नीने आतापर्यंत कुठलाही सन्मान स्वीकारला नाही. नागपूरकरांनी केलेला हा सन्मान मात्र त्यांनी आनंदाने स्वीकारला. राम खांडेकर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्वीय सचिव, माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे स्वीय सचिव, परराष्ट्र खाते, गृह खाते, अर्थ मंत्रालयासह अनेक खात्यात कार्य करणारे शासकीय अधिकारी आहे. नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांच्या जवळची व्यक्ती म्हणून त्यांची गणना व्हायची.
पण सचोटीने आणि प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या खांडेकर यांनी स्वत:साठी कुठलीही माया जमा केली नाही. सरकारी वाहन आणि बंगलाही त्यांनी नाकारला. ते मूळचे नागपूरचे आहेत. निवृत्तीनंतर ते नागपुरात एका फ्लॅटमध्ये कुठल्याही अभिनिवेशाशिवाय राहतात. अनेकांना त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वाची माहिती नाही. अनेक दिग्गज नेत्यांशी मैत्रीचे, सौहार्दाचे संबंध असलेले खांडेकर मात्र विलक्षण साधे आहेत. विदर्भ गौर प्रतिष्ठानच्यावतीने गिरीश गांधी यांच्या पुढाकाराने त्यांच्या कर्तृत्वाचा सत्कार आज करण्यात आला. याप्रसंगी खांडेकर यांनी कृतकृत्य झाल्याची भावना व्यक्त केली. प्रारंभी गिरीश गांधी यांनी प्रास्ताविकातून खांडेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिला. दत्ता मेघे यांनीही खांडेकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.(प्रतिनिधी)