मेलबोर्नमध्ये घुमला विठ्ठलनामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 09:43 IST2016-07-21T16:23:32+5:302016-07-22T09:43:14+5:30
गेल्या वर्षी 2015 मध्ये विठूमाईच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर आमच्या मेलबोर्नवासियांची ही पहिली आषाढी एकादशी. आमच्या विठाईचा हा पहिला सोहळा मग तो थाटातच व्हायला हवा

मेलबोर्नमध्ये घुमला विठ्ठलनामाचा गजर
>शोभा भिडे / किशोर पाठारे
मेलबोर्न - गेल्या वर्षी 2015 मध्ये विठूमाईच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनंतर आमच्या मेलबोर्नवासियांची ही पहिली आषाढी एकादशी. आमच्या विठाईचा हा पहिला सोहळा मग तो थाटातच व्हायला हवा. आम्ही फक्त 10 ते 12 महाराष्ट्रीय कुटुंब या छोट्याशा शहरात पण उत्साह मात्र 100 माणसांचा असावा असा. शनिवारी 16 जुलै रोजी हा कार्यक्रम करण्याचे ठरवले. फक्त दोन मीटिंग्ज झाल्या, सर्व आखीव बेत ठरवला. सर्वप्रथम अभिषेक, पूजा, विठूसहस्त्रनाम, स्थानिक हौशी लोकांची भजने, दिंडी आणि नंतर आरत्यांचा जयजयकार. तयारीला दोनच दिवस होते. सर्वांच्या उत्साहाला भरते आले होते. उद्योगाची जेथे प्रचिती तेथे विठूमाउलीचाच वास असल्याने सर्व कामे भराभर होत गेली.
मानव मंदिरातील दोन गुरूजी श्री. श्रीवर्धन आणि श्री. श्रीरंगा यांनी विठ्ठल रखुमाईच्या मुर्तींवर अभिषेक केला. सौ. उषा वर्धन यांनी पुजेला बसलेल्या तरूण जोडप्यांना उत्तम मार्गदर्शन केले. विष्णूसहस्त्रनामाने मानव मंदिरात पवित्र वातावरण निर्माण झाले. निवडक अभंगांच्या गाण्याने भजनास सुरूवात झाली. प्रथम तुला वंदितो, आणि नंतर ज्ञानोबा माउली तुकारामांचा गजर झाला आणि पसायदान झाले. दिंडी निघाली, विठ्ठल माउली ही जणू कटीवरचे आपले कर सोडून आमच्यात सामील झाली होती.
टाळ, मृदुंग, झांजा, ढोलक यांच्या गजरात विठ्ठल रखुमाईंच्या उत्सव मुर्तींची पालखी निघाली. ज्ञानबा, तुकाराम, विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला, या गजरात आम्ही स्वत:चे बान विसरून नाचत होतो. फुगड्या, झिम्मा आणि शेवटी रिंगण पण झाले. भागवती झेंडे फडफडले आणि दिंडी परत मंदिरात आली. आरत्यांच्या जयजयकाराने आणि नंतर प्रसादाच्या जेवणाने या कार्यक्रमाची सांगता झाली. ह्या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी ओरलँडो, टॅम्पा, जॅक्सनव्हिल, बोकारेटन, फोर्ट लाँडरडेलमधील हौशी मराठी मंडळी आली होती.
आमचे हे मेलबर्नचे छोटे मराठी कुटुंब सर्व आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येण्यासाठी निमंत्रण देत आहे. पंढरीच्या माऊलीला भेटणे सगळ्यांना शक्य नाही, परंतु मानव मंदिरातील विठुमाउलीच्या भेटीला 12 नोव्हेंबर रोजी जरूर या.