संमेलनात पंजाबी-उर्दू साहित्यिकांचीही मांदियाळी
By Admin | Updated: April 1, 2015 03:06 IST2015-04-01T03:06:48+5:302015-04-01T03:06:48+5:30
पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंजाबी, मराठी आणि उर्दू साहित्यिकांची मांदियाळी जमणार आहे.

संमेलनात पंजाबी-उर्दू साहित्यिकांचीही मांदियाळी
मुंबई : पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंजाबी, मराठी आणि उर्दू साहित्यिकांची मांदियाळी जमणार आहे.
३ एप्रिल रोजी भव्य ग्रंथदिंडीने संमेलनास प्रारंभ होईल. यात नांदेडची भक्त नामदेव ग्रंथदिंडी, कविवर्य नारायण सुमंत यांची कृषिदिंडी यांसह देहू, आळंदीहूनही काही दिंड्या सामील होणार आहेत. प्रसिद्ध पंजाबी कवी सुरजितसिंग पातर यांचा विशेष सहभाग असेल. संमेलनाच्या उद्घाटनास पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल उपस्थित राहतील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत मात्र साशंकता आहे. या कार्यक्रमात डॉ. सुधीर रसाळ यांचा सत्कार होईल.
४ एप्रिल रोजी प्रसिद्ध शायर फैज अहमद फैज यांच्या कन्या कवयित्री सलीमा हाश्मी या फैज यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. तर पाच एप्रिल रोजी संमेलनाचा समारोप होईल. दरम्यान, प्रकाशकांनी संमेलनावरील बहिष्कार मागे घेतला असला तरी मौज, काँटिनेंटल, साकेत यांसारखे प्रतिष्ठित प्रकाशक संमेलनात स्टॉल लावणार नाहीत. (प्रतिनिधी)