पोलीस महासंचालक नागपुरात, शुक्रवारी घेणार बैठक
By Admin | Updated: July 21, 2016 23:25 IST2016-07-21T23:25:31+5:302016-07-21T23:25:31+5:30
राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) प्रवीण दीक्षित गुरुवारी रात्री नागपुरात आले. त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी इमामवाड्यातील

पोलीस महासंचालक नागपुरात, शुक्रवारी घेणार बैठक
नागपूर : राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) प्रवीण दीक्षित गुरुवारी रात्री नागपुरात आले. त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी इमामवाड्यातील शाळकरी मुलीचे अपहरण आणि बलात्काराच्या खळबळजनक प्रकरणाच्या निमित्तानेच पोलीस महासंचालक नागपुरात आले असावे, असा तर्क लावला जात आहे.
डीजीपी दीक्षित आज रात्री ८ च्या सुमारास नागपुरात आले. त्यांच्या अचानक आगमनामुळे शहर पोलीस दलात खळबळ निर्माण झाली. मुंबईत अधिवेशन सुरू असताना पोलीस महासंचालकांनी नागपुरात येण्याच्या घडामोडीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. कोपर्डी प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असताना नागपुरात वर्दळीच्या मेडीकल चौक परिसरातून शाळकरी मुलीला दुचाकीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे प्रकरण वादळ निर्माण करू शकते. तसे संकेत मिळाल्यानेच डीजीपी दीक्षित नागपुरात आल्याचे बोलले जाते. या संदर्भात येथील शिर्षस्थ अधिका-यांशी संपर्क साधला असता, पुर्वनियोजित कार्यक्रमानुसारच ते नागपुरात आल्याचे अधिका-यांनी सांगितले. दरम्यान, डीजीपी दीक्षित शुक्रवारी सकाळी वरिष्ठ पोलीस अधिका-यांशी चर्चा करून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. ईमामवाडा पोलीस ठाण्यातही ते भेट देण्याची शक्यता आहे.
आ. गजभियेंनी नोंदविला निषेध
राष्टवादीचे विधानपरिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून, आपण हे प्रकरण विधीमंडळात लावून धरणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. २४ तास होऊनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही, ही बाब लाजिरवाणी असल्याचेही आ. गजभिये म्हणाले.