रेल्वे स्थानकांजवळ वैद्यकीय सेवा

By Admin | Updated: December 4, 2014 03:00 IST2014-12-04T03:00:06+5:302014-12-04T03:00:06+5:30

न्यायालयाच्या दणक्यानंतर रेल्वे प्रशासनाने मुंबई व उपनगरांतील १४ रेल्वे स्थानकांजवळ आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़

Medical services near railway stations | रेल्वे स्थानकांजवळ वैद्यकीय सेवा

रेल्वे स्थानकांजवळ वैद्यकीय सेवा

अमर मोहिते, मुंबई
न्यायालयाच्या दणक्यानंतर रेल्वे प्रशासनाने मुंबई व उपनगरांतील १४ रेल्वे स्थानकांजवळ आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़ येत्या तीन महिन्यांत ही केंद्र सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे़ त्यामुळे नवीन वर्षात तरी निदान रेल्वे अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळतील़
या सेवा केंद्रात एक एमबीबीएस डॉक्टर, नर्स व साहाय्यक पूर्णवेळ असेल़ ही टीम रेल्वे अपघातातील जखमींवर विनाविलंब उपचार करेल़ या सेवा केंद्राआधी रेल्वेने जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रेल्वे स्थानकांजवळ हेलिपॅड उभारण्याचा निर्णय घेतला आहे़ याचे काम सुरू असून या दोन निर्णयांमुळे रेल्वे अपघातात वेळेवर उपचार न मिळाल्याने बळी जाणाऱ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे़
रेल्वे अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेच्या काही स्थानकांजवळ आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र सुरू करा, असे आदेश मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठाने गेल्या वर्षी मार्च महिन्यात दिले होते़ मात्र त्याची अंमलबजावणी रेल्वे प्रशासन करीत नव्हते़ अखेर गेल्या महिन्यात न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने रेल्वे प्रशासनाचे कान उपटत रेल्वे संवदेनशील नसल्याचा ताशेरे ओढले़ तसेच रेल्वे बोर्डाने याचा निर्णय घेण्यासाठी दोन अधिकारी नेमावेत व त्यांनी याबाबतच निर्णय घ्यावा, असे आदेशही न्या़ ओक यांनी दिले होते़ याची दखल घेत रेल्वेने दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली व त्यांनी रेल्वे स्थानकांजवळ आपत्कालीन सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे़ ज्या रेल्वे स्थानकांजवळ जागा उपलब्ध असेल, तेथे ही केंद्रे लगेचच सुरू केली जातील व ज्या स्थानकांजवळ जागा नसेल तेथे तातडीने जागा शोधून ही केंद्र सुरू केली जाणार आहे़
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी जनहित याचिका केली आहे़ अपघातातील जखमींना विनाविलंब उपचार मिळावेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वेला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़ त्याची दखल घेत न्यायालयाने वरील आदेश दिले होते व त्यानुसार रेल्वेने हा निर्णय घेतला असून त्याची माहिती न्यायालयात सादर केल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या हाती लागले आहे़
ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णवेळ आसने राखीव
रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णवेळ आसने राखीव ठेवण्याचा निर्णयही रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़ सध्या ही आसने ठरावीक वेळेसाठी ज्येष्ठ नागरिकांकरिता राखीव असतात़ याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल असून ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेमध्ये गैरसोय होत असल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे़ त्याची दखल घेत रेल्वेने हा निर्णय घेतला आहे़

Web Title: Medical services near railway stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.