मुंबई : गोहत्येचा गुन्हा वारंवार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांवर यापुढे संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिला.
अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी श्रीगोंदा येथील कायदा सुव्यवस्थेबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. गो तस्करीचे प्रमाण वाढत चालल्याने हे प्रकार रोखण्यासाठी वेगळा कायदा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मकोका कारवाई करण्याचा इशारा दिला. तत्पूर्वी, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करीत गुन्हेगाराला अटकही केली. मात्र, आरोपीची न्यायालयातून जामिनावर सुटका झाली.
२५ हजार कोटींच्या वसुलीसाठी अभय योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे राज्य सरकारची जवळपास २५ हजार कोटी रुपयांची कर थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी सरकारने विशेष सवलती देण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी अभय योजना जाहीर केली.