महापौर पंतप्रधानांची जाहीर माफी मागणार
By Admin | Updated: July 22, 2015 01:23 IST2015-07-22T01:23:26+5:302015-07-22T01:23:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती जर्मनीचा हुकूमशाह हिटलरसारखीच असल्याचे वादग्रस्त विधान महापौर स्नेहल आंबेकर यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे़

महापौर पंतप्रधानांची जाहीर माफी मागणार
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती जर्मनीचा हुकूमशाह हिटलरसारखीच असल्याचे वादग्रस्त विधान महापौर स्नेहल आंबेकर यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे़ भाजपा नगरसेवकांनी आज महापौर दालनात ठिय्या मांडून मित्रपक्षाविरोधात निदर्शने केली़ अखेर लेखी माफी मागण्याचे आश्वासन आंबेकर यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़
आंबेकर यांनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून नवा वाद ओढवून घेतला़ मोदींच्या कार्यपद्धतीबद्दल आदर आहे, मात्र त्यांची पद्धत हिटलरसारखी वाटते, असे विधान करीत महापौर आंबेकर यांनी केले़ त्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ भाजपाच्या नगरसेवकांनी पालिका मुख्यालयातील महापौर दालनातच आज दुपारी ठिय्या आंदोलन केले.
प्रसिद्धीमाध्यमांनी आपल्या बोलण्याचा विपर्यास केल्याचे स्पष्टीकरण महापौरांनी सोमवारी दिले़ परंतु या स्पष्टीकरणाने समाधान न झालेल्या भाजपाने त्यांच्याकडून लेखी माफीची मागणी केली़
सुमारे तासभर भाजपाचे नगरसेवक महापौरांच्या दारात बसून राहिल्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला़ अखेर महापौर आंबेकर यांनी वृत्तपत्रांमधून जाहीर खुलासा करण्याचे आश्वासन देऊन सुटका करून घेतली़ मात्र त्यांच्यामुळे
पक्षावर ओढावलेल्या नामुष्कीने शिवसेनेच्या गोटात नाराजीचे वातावरण आहे़ (प्रतिनिधी)