महापौर माळवींना अटक, सुटका
By Admin | Updated: February 6, 2015 01:22 IST2015-02-06T01:21:23+5:302015-02-06T01:22:00+5:30
लाच प्रकरण : स्वत:हून पोलिसांत हजर; ‘लाचलुचपत’कडून पाच तास कसून चौकशी

महापौर माळवींना अटक, सुटका
कोल्हापूर : लाचप्रकरणातील संशयित आरोपी महापौर तृप्ती अवधूत माळवी ह्या स्वत:हून गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पोलिसांत हजर झाल्या. पोलिसांनी त्यांची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करून अटक केली. त्यानंतर त्यांची सुमारे पाच तास लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशी करण्यात आली. दुपारी तीनच्या सुमारास त्यांना जिल्हा सत्र न्यायाधीश के. डी. बोचे यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीश बोचे यांनी त्यांची ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. निकाल ऐकण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसह वकिलांनी मोठी गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय व न्यायालय परिसरात लक्ष्मीपुरी पोलिसांनी सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
शिवाजी पेठेतील महापालिकेने संपादन केलेली परंतु वापर न केलेली जागा परत देण्यासाठी तक्रारदार संतोष हिंदुराव पाटील यांच्याकडून १६ हजारांची लाच स्वीकारल्याच्या संशयावरून महापौर तृप्ती माळवी व त्यांचा खासगी स्वीय साहाय्यक अश्विन गडकरी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते, परंतु दुसऱ्या दिवशी महापौर माळवी या रक्तदाब वाढल्याने राजारामपुरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. कालच त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता. त्यांना अटक करण्यासाठी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची प्रतीक्षा एसीबीचे पोलीस करीत होते. मात्र, शनिवार पेठेतील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात महापौर स्वत:हून सकाळी हजर झाल्या. पोलिसांनी सीपीआरमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटक केली. पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप कदम, सांगलीचे पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे व पद्मा कदम यांनी त्यांची बंद खोलीत सुमारे पाच तास जबाब घेत त्यांच्या आवाजाची (व्हॉईस रेकॉर्डिंग) तपासणी केली. दुपारी तीनच्या सुमारास त्यांना पोलीस व्हॅनमधून न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा सरकारी वकील दिलीप मंगसुळे यांनी महापौर माळवी यांच्या समर्थकांकडून तक्रारदार व साक्षीदारांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे (पान९ वर)
न्यायालयाचे आदेश
महापौर माळवी यांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर होईपर्यंत पोलिसांना तपासकामी सहकार्य करावे. तक्रारदार किंवा साक्षीदारांवर दबाब टाकू नये, सोमवार आणि शुक्रवारी ३ ते ५ या वेळेत ‘एसीबी’च्या कार्यालयात हजेरी लावावी.
घटनाक्रम
३० जानेवारी : तक्रारदार संतोष पाटील यांनी लाचलुचपत विभागाकडे महापौरांच्या विरोधात तक्रार केली. त्यानंतर त्याच दुपारी १६ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महापौर तृप्ती माळवी यांच्यासह खासगी स्वीय साहाय्यक अश्विन गडकरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
३१ जानेवारी : अटकेच्या भीतीने
महापौर रुग्णालयात
२ फेब्रुवारी : महापौरांचा अटकपूर्व जामीन मंजुरीचा अर्ज न्यायालयात सादर
३ फेब्रुवारी : महापौरांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
४ फेब्रुवारी : महापौर स्वत:हून पोलिसांत हजर, पोलीस चौकशी पूर्ण,
जामिनावर मुक्तता.
माझ्याविरोधात राजकीय षङ्यंत्र आहे. मी गुन्हेगार नाही, परंतु या घटनेविरोधात शेवटपर्यंत लढणार आहे. प्रसारमाध्यमांनी मला मोठं केलं आहे, त्यांनीच या संपूर्ण घटनेमागील सूत्रधार शोधून सत्य जनतेसमोर आणावे.
- तृप्ती माळवी, महापौर
संशयित आरोपी महापौर माळवी यांच्या आवाजाच्या व्हॉईस रेकॉर्डिंगची सीडी न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविली आहे. आता पुन्हा त्यांच्या आवाजाचे व्हॉईस रेकॉर्डिंग करून घेतले आहे. दोन्ही रेकॉर्डिंगची तपासणी या प्रयोगशाळेत केली जाईल. त्यानंतर जो रिपोर्ट येईल तो न्यायालयात सादर केला जाईल.
- दिलीप कदम, अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे
नेत्यांना पकडले कोंडीत
महापालिका कायद्यात महापौरांवर अविश्वास आणण्याची तरतूद नाही. महापौर माळवी यांनी पदाचा राजीनामा न दिल्यास त्या १५ नोव्हेंबर २०१५ पर्यंत नवीन सभागृह अस्तित्वात येईपर्यंत त्या पदावर राहू शकतात. संपूर्ण सभागृह त्यांच्या विरोधात गेले तरी त्यांच्या पदास कोणताही धोका नाही. लाचखोरी प्रकरणात राष्ट्रवादीने अडगळीत टाकल्याच्या मानसिकेतून महापौर माळवी यांनी ‘राजीनामा तूर्त नाही,’ असे भाष्य करून नेत्यांची गोची केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
यापूर्वीचा अनुभव
तत्कालीन महापौर सई खराडे २००५ साली दहा महिन्यांसाठी महापौर बनल्या होत्या त्यानंतर सरिता मोरे व माणिक पाटील यांना संधी मिळणार होती. मात्र, दहा महिन्यांनंतर राजीनामा न देता आठ ते दहा नगरसेवकांसह त्या जनसुराज्य आघाडीत सामील झाल्या. अडीच वर्षांचा पूर्ण कार्यकाल त्या महापौरपदी राहिल्या. माळवी प्रकरणाने खराडे यांच्या राजीनामा प्रकरणास पुन्हा उजाळा मिळाला आहे.
राजीनामा देण्यास महापौरांचा नकार
कोल्हापूर : लाचप्रकरण हे माझ्या विरोधातील षङ्यंत्र आहे. त्यामुळे ‘महापौरपदाचा राजीनामा देण्याचा तूर्तास विचार केलेला नाही,’ असे सूचक विधान महापौर तृप्ती माळवी यांनी गुरुवारी जामीन मंजूर झाल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर पत्रकारांंशी बोलताना केले.
महापालिकेच्या सोमवारी (दि. ९) होणाऱ्या महासभेत महापौर राजीनामा देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले होते. आता माळवी यांच्या सूचक वक्तव्याने महापौरपदासाठी इच्छुक काँग्रेस नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे.
राष्ट्रवादी पक्षावर आपला पूर्ण विश्वास आहे. पक्षाच्या आदेशाशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. मी न खचता पुन्हा उभी राहणार आहे, असे स्पष्ट करत महापौर माळवी यांनी तूर्त महापौरपदाचा राजीनामा न देण्याचे संकेत दिल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली.
काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या पक्षीय समझोत्यानुसार सभागृहाच्या शेवटच्या दहा महिन्यांसाठी महापौरपद काँग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. ठरल्याप्रमाणे काँग्रेसने यापूर्वीच स्थायी सभापतिपद सोडून दिले. आता महापौरपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीने पक्षीय समझोता पाळण्याची वेळ आहे. मात्र, महापौर माळवी या राजीनामा न देण्यावर ठाम राहिल्यास राष्ट्रवादीची राजकीय अडचण होऊ शकते.
लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर ३१ जानेवारी रोजी माळवी यांनी गटनेते राजेश लाटकर यांच्याकडे महापौरपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र, त्यांचा राजीनामा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अधिकृतपणे मंजूर होत नाही, तोपर्यंत त्याला किंमत नाही. सोमवारी होणाऱ्या सभेत स्वत: हजर राहून माळवी यांनी राजीनाम्याबाबत भाष्य न केल्यास सभागृह किंवा पक्षनेतृत्व काहीही करू शकणार नाहीत. (पान९ वर)
काँग्रेसमध्ये अवस्थतता
काँग्रेसतर्फे महापौरपदासाठी दीपाली ढोणुक्षे, वैशाली डकरे, मीना सूर्यवंशी, अर्पणा आडके, संगीता देवेकर, कांचन कवाळे इच्छुक आहेत. महापौर माळवी राजीनामा देणार नसल्याच्या बातमीने कॉँग्रेस नगरसेवकांत
अस्वस्थता पसरली.
महापौर माळवी यांच्या विधानाचा विपर्यास्त काढला आहे. त्या ठरल्याप्रमाणे सोमवारी सभेत राजीनामा देतील. याबाबत त्यांच्याशी आज चर्चा झाली आहे. त्यांनी राजीनामा न देण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्या राजीनामा न देण्याबाबतची चर्चा ही फक्त अफवाच असल्याचे महापौर माळवी यांनी माझ्याशी बोलताना स्पष्ट केले आहे.
- राजेश लाटकर, गटनेता राष्ट्रवादी