मातोश्रीवर भेटीचे ‘राज’
By Admin | Updated: July 30, 2016 05:53 IST2016-07-30T05:53:40+5:302016-07-30T05:53:40+5:30
ठाकरे बंधूंमधील ‘राज’कारणाने आज दादरच्या कृष्णकुंजहून वांद्रा येथील मातोश्रीकडे अचानक वळण घेतले. अनेक दिवसांनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर पायधूळ झाडत

मातोश्रीवर भेटीचे ‘राज’
मुंबई : ठाकरे बंधूंमधील ‘राज’कारणाने आज दादरच्या कृष्णकुंजहून वांद्रा येथील मातोश्रीकडे अचानक वळण घेतले. अनेक दिवसांनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर पायधूळ झाडत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एक तास बंदद्वार चर्चा केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले. ठाकरे बंधूंमध्ये कौटुंबिक वास्तपुस्त होऊन राजकीय दुरावा कमी करण्यावरही एकमत झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
साडेतीन वर्षांनी राज शुक्रवारी पुन्हा मातोश्रीवर गेले. उद्धव यांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या, स्नेहभोजनही घेतले. राज यांच्या ‘मातोश्री’भेटीची वार्ता कानोकानी होताच तर्कवितर्कांना एकच उधाण आले. मुंबईसह राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षारंभी होणार आहेत. त्यादृष्टिने या भेटीकडे पाहिले जात आहे. तसेच उद्धव आणि जयदेव यांच्यात सुरू असलेल्या वादाने वेगळे वळण घेतले असल्याने राज यांनी मध्यस्थी केल्याचे समजते. या भेटीबाबत उद्धव वा राज यांनी अधिकृतपणे कोणताही खुलासा केला नसला तरी, सुत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार उभयतांमध्ये एकत्र येण्यावरही चर्चा झाल्याचे समजते. देशभर भाजपाचे वारू चौखुर उधळत असून प्रादेशिक पक्षांना संपविण्याचे धोरण अमित शहा आणि प्रभुती राबवत आहेत. हा धोका शिवसेना ओळखून आहे. अशा परिस्थितीत राज यांची साथ कामी येऊ शकते, असा तर्क शिवसेनेत लढविला जात आहे. राज यांचे सहकार्य लाभले तर मुंबईत निर्विवाद सत्ता मिळू शकते. उभयतांच्या भेटीमागे हे राजकारण असल्याचे समजते. (विशेष प्रतिनिधी)
...अन् गाडी मातोश्रीत
राज यांच्या मातोश्री भेटीत नेमके काय घडले, ही ‘आतली’ बातमी गुलदस्त्यात ठेवत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेले कथन असे- मला राजसाहेबांनी काल सायंकाळी कृष्णकुंजवर बोलावले होते. पण नंतर शुक्रवारी सकाळी ये असा निरोप आला. त्यानुसार मी सकाळी कृष्णकुंजवर गेलो. चहा घेतला. ते तयार होऊन आले आणि मला ‘चल बाहेर जायचे आहे,’ असे सांगितले. त्यावर शर्मिला वहिनींनी कोठे जाताय, असे विचारले. पण काहीही न बोलता आम्ही खाली आलो. नंतर गाडीत बसलो आणि गाडी थेट मातोश्रीच्या दिशेने निघाली. मी आश्चर्यचकित झालो होतो. आम्ही गेलो.
बाळासाहेबांच्या फोटोला त्यांनी नमस्कार केला. त्यानंतर ते आणि उद्धवजी दोघेही वरच्या माळ्यावर गेले. तासाभराने दोघे खाली आले. मी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते दारापर्यंत सोडायला आले. आमची गाडी मातोश्रीच्या बाहेर जाईपर्यंत ते दाराबाहेरच उभे होते. पण गाडीत बसल्यावर राज यांनी दुसऱ्याच विषयावर गप्पा सुरू केल्या..!