मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 05:52 IST2025-07-12T05:52:29+5:302025-07-12T05:52:54+5:30

विश्वस्तांच्या संपत्तीचीही चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Massive scams worth crores, bogus recruitment; Shani Shingnapur Temple Trust dissolved - CM Devendra Fadnavis | मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त

मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त

मुंबई - शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये विश्वस्त, अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले असून तेथील विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. विश्वस्तांच्या अपसंपदेची चौकशी केली जाईल, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील. देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असलेल्या शनि मंदिरातील घोटाळ्यांबद्दलची लक्षवेधी सूचना स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी मांडली होती. या ट्रस्टच्या विश्वस्तांनी बनावट ॲप तयार करून लाखो भक्तांकडून त्यावर पूजेसाठीच्या देणग्या स्वीकारल्या. असे तीन-चार बनावट ॲप होते आणि प्रत्येक ॲपवर तीन ते चार लाख भक्तांनी पैसे पाठविले, असे लंघे म्हणाले. या शिवाय बोगस भरतीवरही त्यांनी प्रकाश टाकला. एकूण घोटाळा १०० कोटींचा असल्याचे ते म्हणाले. भाजपचे सुरेश धस यांनी हा घोटाळा ५०० कोटींचा असून  ट्रस्टचे विश्वस्त दर आठवड्याला दहा-दहा कोटी रुपयांच्या जमिनी घेत आहेत, असा हल्लाबोल केला.

पंढरपूर, शिर्डीच्या धर्तीवर शिंगणापूरमध्ये समिती  : पंढरपूरमधील विठ्ठल देवस्थान, शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या धर्तीवर शनि शिंगणापूर मंदिराच्या संचालनासाठी शासकीय समिती स्थापन करण्याचा कायदा विधिमंडळाने केलेला आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या पुढे मंदिरावर शासकीय नियंत्रण असेल असे संकेत दिले.

बनावट ॲपवरून भक्तांना लुटले, तब्बल २,४४७ कर्मचाऱ्यांची भरती

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्रस्टच्या व्यवहारांची चौकशी केलेल्या सरकारी समितीच्या अहवालातील धक्कादायक माहिती सभागृहाला दिली, तेव्हा सभागृह अवाक् झाले. बनावट ॲपवर भक्तांकडून देणग्या घेतल्या जायच्या आणि त्यातील कोट्यवधी रुपये हे विश्वस्तांच्या कार्यकर्त्यांच्या नावे उघडलेल्या बँक खात्यांमध्ये परस्पर जमा व्हायचे, असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी केला. एकच ॲप खरे तर अन्य बनावट होते. या प्रकाराची सायबर सेलच्या अति. पोलिस महासंचालकांमार्फत चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या मंदिरात मी गेली अनेक वर्षे जातो. २५८ कर्मचारी होते तेव्हा मंदिराचा कारभार नीट चालायचा. विश्वस्त मंडळाने तब्बल २,४४७ कर्मचाऱ्यांची भरती केली. चौकशीमध्ये प्रत्यक्षात तेवढे कर्मचारी अस्तित्वातच नसल्याचे आढळले, असे ते म्हणाले.

बाहेरच्या अधिकाऱ्यांकडून घोटाळ्याची चौकशी  
शनि शिंगणापूरच्या शनि मंदिरातील घोटाळ्यांप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. त्यातील घोटाळेबाजांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले जातील. बाहेरच्या अधिकाऱ्यांकडून या घोटाळ्याची सखोल चौकशी केली जाईल. कारण आधी धर्मादायच्या एका अधिकाऱ्याने एवढे होऊनही क्लीन चिट दिलेली होती. असा चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Massive scams worth crores, bogus recruitment; Shani Shingnapur Temple Trust dissolved - CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.