MARGAO CHAIR PERSON RESIGNS AFTER OPPOSITION TO JACK SEQUIRA'S STATUE | सिकैरांच्या पुतळ्याच्या वादानंतर मडगाव नगराध्यक्षांचा राजीनामा
सिकैरांच्या पुतळ्याच्या वादानंतर मडगाव नगराध्यक्षांचा राजीनामा

मडगाव:  ऐतिहासिक ओपिनियन पोल चळवळीत गोव्याचे अस्तित्व कायम रहावे यासाठी गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण करण्यास विरोध करणारे जॅक सिकैरा यांचा  पुतळा मडगावात उभा करण्यासंदर्भात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून, त्याची परिणिती म्हणजे मडगाव पालिकेच्या नगराध्यक्ष बबिता प्रभुदेसाई यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

जॅक सिकैरांच्या पुतळ्याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही, जर त्यासाठी आपल्याला पदाचा राजीनामा द्यावा लागला तरी बेहत्तर असे नमूद करुन मडगावच्या नगराध्यक्ष बबिता प्रभूदेसाई यांनी आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यापूर्वी जाहीर केले होते. सायंकाळी उशिरा त्यांनी आपले राजीनामा पत्र नगरपालिका प्रशासन संचालकांच्या कार्यालयात फॅक्सद्वारे पाठविले.  मडगावात ओपिनियन पोल चौकात जॅक सिकैरा यांचा पुतळा उभारण्याचा मडगाव पालिकेच्या बैठकीत ठराव घेण्यात आला होता. मात्र हा ठराव तांत्रिकदृष्टय़ा योग्य नसून असा पुतळा उभारायचा असल्यास त्याला सरकारची परवानगी घ्यावी लागते असा दावा करुन काँग्रेसच्या व भाजपाच्या एकूण 14 नगरसेवकांनी या ठरावाला विरोध केला होता. शुक्रवारी सकाळी या 14 नगरसेवकांनी संयुक्तरीत्या पत्रकार परिषद घेत 48 तासात ठराव बदला अन्यथा नगराध्यक्षानी पदाचा राजिनामा द्यावा  अशी मागणी केली होती. त्यानंतर सायंकाळी प्रभुदेसाई यांनी आपण राजिनामा देत असल्याचे सर्व गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत जाहीर केले.

त्या म्हणाल्या, जॅक सिकैरामुळेच गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहिले. अशा गोमंत पुरुषाच्या पुतळ्याला विरोध करण्यासाठी काँग्रेससारखा पक्ष विरोधी भाजपाच्या हातात हात घालून पुढे येतो ही आश्चर्यजनक गोष्ट आहे. हा पुतळा फातोर्डा मतदारसंघात येतो. त्याला फातोडर्य़ातील लोकांनी किंवा नगरसेवकांनी विरोध केलेला नाही. असे असतानाही मडगावच्या नगरसेवकांचा या पुतळ्याला विरोध का असा सवाल त्यांनी केला.

एका प्रश्र्नाला उत्तर देताना प्रभुदेसाई म्हणाल्या, जर जॅक सिकैरांचा पुतळा उभा करणार असे ठाम आश्र्वासन सरकारकडून आम्हाला मिळाल्यास आमची ठरावात बदल करण्याची तयारीही आहे. मात्र यापूर्वी विधानसभा आवारात सिकैरांचा पुतळा  उभा करण्याचा प्रस्ताव आला होता त्यावेळी त्या ठरावाला विरोध झाला होता याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, कुठल्याही परिस्थितीत ठरलेल्या तारखेला मडगावच्या ओपिनियन पोल चौकात सिकैरांचा पुतळा उभा रहाणारच आणि तो लोकांच्या सहाय्याने आम्ही उभा करणार.

यापूर्वी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि पर्रीकर सरकारातील त्यावेळचे नंबर 3 क्रमांकचे मंत्री विजय सरदेसाई यांनी विधानसभा आवारात सिकैरा यांचा पुतळा उभा करण्याचा ठराव विधानसभेत मांडला होता. मात्र त्याला सरकार पक्षातील सदस्यांनीच विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव बारगळला होता. र्पीकर यांच्या निधनानंतर विजय सरदेसाई यांनाही सरकारमधून बाहेर काढण्यात आले होते.

मडगावातील रस्त्यांना महत्वांच्या व्यक्तींची नावे देण्यासंदर्भात मागच्या बैठकीत काही नगरसेवकांनी विरोध केला होता. त्यासंदर्भात बोलताना प्रभूदेसाई म्हणाल्या, मनोहर र्पीकर, उल्हास बुयांव, पाद्री मिरांडा यासारख्या व्यक्तींची नावे आम्ही रस्त्यांना देणार होतो. अशा व्यक्तींची नगरसेवकांना ओळख करुन देण्याची गरज नाही, एवढे त्यांचे कार्य मोठे आहे. आम्ही ज्या रस्त्यांना नावे देणार होतो त्या रस्त्यांना यापुर्वी नाव दिलेले नाही. याउलट मडगावचे काँग्रेसचे नगरसेवक ज्या रस्त्यांना सी.पी. द. कॉस्ता, मधुकर मोर्डेकर व सेबेस्तियान कुन्हा यांची नावे देऊ पहात होते त्या रस्त्यांना पूर्वीच नाव दिले गेलेले आहे. यावरुन फातोडर्य़ाच्या नगरसेवकांनी ही नावे देण्याचा प्रस्ताव आणण्यापूर्वी योग्य तो गृहपाठ केला होता. काँग्रेसच्या नगरसेवकांनी तो केला नसल्यास ती त्यांची चुक आहे. गुरुवारी बेंबीच्या देठापासून ओरडणा:या काँग्रेसच्या नगरसेविका डॉरीस टेक्सेरा यांनी त्याचा जाब आपल्या गटातील नगरसेवकांना विचारावा असेही प्रभूदेसाई म्हणाल्या.


मी कुठलीही सुचना केलेली नाही : दिगंबर
जॅक सिकैरांच्या पुतळ्याला विरोध करण्यासाठी मडगावात काँग्रेस व भाजपाच्या नगरसेवकांनी युती केल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांची प्रतिक्रिया विचारली असता, मी नगरसेवकांना कुठलीही सुचना केलेली नाही आणि या मुद्दय़ावर आमचे बोलणोही झालेले नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, गुरुवार व शुक्रवार हे दोन्ही दिवस मी पणजीत व्यग्र होतो त्यामुळे नगरसेवकांशी बोलण्यास मला वेळ मिळाला नाही. मडगाव पालिका बैठकीत जो ठराव आला होता त्यात फेरफार केला गेल्याने आम्ही त्याला विरोध केला असे काही नगरसेवकांनी आपल्याला फोनवरुन सांगितले. जर ठराव चुकीचा असेल तर तो बदलून घ्या अशा सुचना आपण त्यावेळी केल्या. जर ठरावाच्या मसुदय़ात मुद्दामहून कोणी फेरफार करत असल्यास इतर नगरसेवक ते कसे खपवून घेणार असा सवाल त्यांनी केला.


गोवा फॉरवर्डची सत्ता जाणार का?
बबिता प्रभूदेसाई यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिल्यानंतर मडगाव पालिकेवर असलेली गोवा फॉरवर्डची सत्ता जाणार का? सध्या या प्रश्र्नाने उचल खाल्ली आहे. सध्या मडगाव पालिकेतील नगरसेवकांचे संख्याबळ 25 असून गोवा फॉरवर्डकडे केवळ 11 नगरसेवक आहेत. 14 नगरसेवकांनी आपला वेगळा गट तयार केला आहे. असे जरी असले तरीही प्रभूदेसाई या पायउतार झाल्यानंतर विरोधी गटाच्या डॉरिस टेक्सेरा यांच्याकडे नगराध्यक्ष पद चालून येण्याची शक्यता सध्या तरी नाकारली जात आहे. येत्या सात दिवसात पालिकेच्या राजकारणात बरेच बदल होण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते. जर गोवा फॉरवर्डचीच सत्ता पालिकेवर कायम राहिली तर पुजा नाईक या नवीन नगराध्यक्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शुक्रवारी पत्रकार परिषदेत प्रभुदेसाई यांना गोवा फॉरवर्ड नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार नाही का असे विचारले असता, त्याचा निर्णय आम्ही नंतर घेऊ. असे निर्णय आम्ही विचारविनिमय करुन घेतो. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई हे योग्य तो निर्णय घेतील असे सूचक उत्तर त्यांनी दिले.

Web Title: MARGAO CHAIR PERSON RESIGNS AFTER OPPOSITION TO JACK SEQUIRA'S STATUE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.