मराठवाड्यात मतदानाचा टक्का वाढला..!

By Admin | Updated: October 16, 2014 04:45 IST2014-10-16T04:45:18+5:302014-10-16T04:45:18+5:30

यंदा मतदारांची मानसिकता आरंभशूराप्रमाणे दिसली. सकाळी सकाळीच मतदान केंद्रासमोर रांगा लागल्या; पण जसजसे ऊन तापले तशी ही गर्दी ओसरली

Marathwada voting percentage increased ..! | मराठवाड्यात मतदानाचा टक्का वाढला..!

मराठवाड्यात मतदानाचा टक्का वाढला..!

यंदा मतदारांची मानसिकता आरंभशूराप्रमाणे दिसली. सकाळी सकाळीच मतदान केंद्रासमोर रांगा लागल्या; पण जसजसे ऊन तापले तशी ही गर्दी ओसरली. दुपारी तर वामकुक्षी घ्यावी इतपत शुकशुकाट झाला होता. पुन्हा उन्हे उतरल्यानंतर थोडाफार उत्साह दिसला; पण तो सकाळसारखा नव्हता. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतील अवस्था यापेक्षा वेगळी नसली तरी सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी ६५ ते ७० च्या आसपास दिसते. जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि भोकरदन या दोन मतदारसंघांमध्ये मात्र वेगळी स्थिती होती. येथे सकाळपासूनच प्रचंड उत्साह दिसून आला. या दोन्ही ठिकाणी अटीतटीची लढत असल्याचे अखेरपर्यंत दिसले. घनसावंगीतून राजेश टोपे, तर भोकरदनमधून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे हे निवडणूक लढवत असून, प्रारंभीपासूनच या लढती प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांपैकी पैठण आणि औरंगाबाद पूर्व या दोन ठिकाणी उत्साह जाणवत होता. सर्वत्र शांततेत मतदान झाले. मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी काही ठिकाणी होत्या, तर सिल्लोडमध्ये अफवांचा सुळसुळाट झाला होता.
जालन्यात घनसावंगी व भोकरदन वगळता इतरत्र सर्वसाधारण प्रतिसाद होता; मात्र बदनापूरमध्ये मतदारांत फारसा उत्साह दिसून आला नाही. या मतदारसंघांतील देशगव्हाण या गावांत लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. सेवली येथे काँग्रेस आणि भाजपा समर्थकांमध्ये हाणामारी झाली. जालना शहरात मात्र फारसा उत्साह जाणवला नाही.
बीडमध्ये सकाळी मतदारांत फारसा उत्साह नव्हता. मात्र, सांयकाळी चारनंतर मतदारांच्या रांगा दिसत होत्या. गेवराई मतदारसंघातील सावरगावच्या गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला, तर केजमधील जवळा गावच्या मतदारांनी वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी टाकलेला बहिष्कार दुपारी मागे घेतला. परळीत पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष असून, वातावरणात तणाव होता; पण आज येथे शांततेत मतदान झाले.
परभणीत मतदारांचा चांगला प्रतिसाद होता; पण वादामुळे काही ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली. पाथरी येथे नगराध्यक्षांना धक्काबुक्की झाल्याने वाद झाला, तर परभणीच्या मोमीनपुरा भागात तणाव निर्माण झाला होता. शिवसेना आणि मजलीस-ए- इत्तेहादुल मुसलमीन या पक्षांच्या समर्थकांमध्ये वाद निर्माण झाला होता; पण पोलिसांनी हे प्रकरण कुशलतेने हाताळले. परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड या चारही मतदारसंघांत चांगला उत्साह होता. प्रामुख्याने तरुणांमध्ये तो ठळकपणे जाणवला.
लातूर जिल्ह्यातील लातूर, लातूर ग्रामीण, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर या मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान झाले. उजनी येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
नांदेड जिल्ह्यात सकाळी दिसणारा उत्साह दुपारी ओसरला. नऊ मतदारसंघांमध्ये थोड्याफार फरकाने अशीच अवस्था होती. तरी सायंकाळी मतदार घराबाहेर पडल्याने मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसते. मुखेड तालुक्यातील तांडा येथील ग्रामस्थांनी मतदान केंद्राची मागणी केली होती; परंतु ती मान्य झाली नाही. त्यामुळे दुपारपर्यंत बहिष्कार टाकला होता. प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर लोक मतदानाला तयार झाले.
हिंगोली येथे मतदानासाठी पैसे वाटणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वसमत मतदारसंघातील शिरडशहापूर येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तिन्ही मतदारसंघांत शांततेत मतदान झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, परंडा या मतदारसंघांत चांगला प्रतिसाद होता. येडशी येथे पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
एकूणच मराठवाड्यात शांततेत मतदान झाले आणि २००९ च्या तुलनेत टक्केवारी वाढल्याचे दिसून आले़

Web Title: Marathwada voting percentage increased ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.