"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 11:13 IST2025-08-04T11:11:41+5:302025-08-04T11:13:51+5:30

महाराष्ट्रात मराठी बोलली जावी असा आग्रह करणे चुकीचे नाही. परंतु कुणी मराठी बोलत नाही म्हणून त्याला मारहाण करणे आमच्या सरकारला मान्य नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Marathi vs Hindi Controversy: "We will welcome whoever comes to Mumbai..."; What did CM Devendra Fadnavis say about Nishikant Dubey and Raj Thackeray, Uddhav Thackeray? | "मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुंबई - मराठी माणूस संकुचित विचार करणारा नाही. मराठी भाषेसाठी सामान्य मराठी माणूस आग्रही आहे परंतु कुणावर हिंसा करणारा मराठी माणूस नाही. मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू. कुणाशी गैरवर्तवणूक होणार नाही याची काळजी घेऊ असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी आणि हिंदी भाषिक वादावर भाष्य केले. निशिकांत दुबे यांच्या विधानावरही फडणवीसांनी उत्तर दिले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निशिकांत दुबे पटक पटक के मारेंगे आणि राज ठाकरे डुबा डुबा के मारेंगे या दोघांशीही आमचा संबंध नाही. जो कुणी मुंबईत येईल त्याचे आम्ही स्वागत करू. कुणाशीही गैरवर्तवणूक होऊ देणार नाही. जो भारताचा कायदा सांगतो, ते आम्ही करू. कुणालाही भाषेच्या आधारे मारहाण योग्य नाही. महाराष्ट्रात मराठी यावी हा आग्रह योग्य परंतु मारहाण करणे हा दुराग्रह नको. मराठी बोलत नाही म्हणून मारहाण करू शकत नाही. नितेश राणे जे बोलले त्याचे समर्थन नाही. केवळ हिंदूंना मारले जाते, इतर धर्मीयांना नाही..नितेश राणे बोलले ते एकप्रकारे योग्य आहे परंतु ते बोलणे चुकीचे आहे. केवळ भाषेच्या आधारे, धर्माच्या आधारे विभाजन करू शकत नाही. हे चुकीचे आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुंबईत २-३ घटना निश्चित झाली असेल, त्यावर आमच्या सरकारने कारवाई केली आहे. महाराष्ट्रात मराठी शिकणे बंधनकारक आहे. त्यावर तडजोड नाही. महाराष्ट्रात मराठी बोलली जावी असा आग्रह करणे हेदेखील चुकीचे नाही. परंतु कुणी मराठी बोलत नाही म्हणून त्याला मारहाण करणे आमच्या सरकारला मान्य नाही. असं जो कुणी करेल त्याच्यावर आम्ही कारवाई करणार म्हणजे करणारच असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी या वादावर मत मांडले. 

दरम्यान, निशिकांत दुबे यांचे पूर्ण विधान मी ऐकले नाही. परंतु त्यांनी मराठी माणसांबाबत काही म्हटले असेल तर ते चुकीचे आहे. आपण इतके संकुचित का होतोय? मराठी माणसांची संस्कृती, आपला इतिहास काय आहे, मराठ्यांनी केवळ महाराष्ट्र आणि मराठीसाठी लढाई केली नाही तर देशात हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे मराठे होते. मराठ्यांनी पानीपतची लढाई का लढली, अहमद शाह अब्दालीने पंजाब, बलुचिस्तान मला द्या, बाकीचा प्रांत तुम्ही ठेवा असं सांगितले. मराठ्यांना वाटलं असते तर त्यांनी अब्दालीसोबत समझौता केला असता परंतु एक इंचही जमीन आम्ही देणार नाही. तिथे पानीपतला जाऊन मराठे लढले, लाखो मृत पावले. १० वर्षांनी पुन्हा मराठ्यांनी दिल्ली ताब्यात घेतली. तिथे भगवा झेंडा फडकावला. हा मराठ्यांचा इतिहास आहे. मराठी माणूस इतका संकुचित असू शकत नाही. हे जे चाललंय ते राजकारण आहे असा आरोपही भाषिक वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

"कुणीही एकत्र आले तरीही महापालिका आम्हीच जिंकणार"

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात काय हे त्यांनाच माहिती, मला त्यांच्या मनातलं माहिती नाही. परंतु बऱ्याचदा राजकीय परिस्थिती अशी असते की लोकांना सोबत यावे लागते. आता दोघांचीही राजकीय परिस्थिती सारखी आहे म्हणून ते एकत्र आलेत. आता ते पुढे काय करतील माहिती नाही. मात्र माझा हा एपिसोड रेकॉर्ड ठेवा, महापालिका निवडणुका झाल्यावर दाखवा. कुणीही कुणासोबत गेले तरीही महापालिका निवडणूक आम्हीच जिंकणार, आमची महायुती महापालिका निवडणूक जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

Web Title: Marathi vs Hindi Controversy: "We will welcome whoever comes to Mumbai..."; What did CM Devendra Fadnavis say about Nishikant Dubey and Raj Thackeray, Uddhav Thackeray?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.