केंद्राच्या नोकरीत 'मराठी' टक्का कमी; परीक्षा देणारे लाखात, निवडीचे प्रमाण मात्र अल्प
By पोपट केशव पवार | Updated: February 1, 2025 16:55 IST2025-02-01T16:55:19+5:302025-02-01T16:55:57+5:30
जनजागृतीचा अभाव : इंग्रजी भीतीही ठरतेय कारणीभूत

संग्रहित छाया
पोपट पवार
कोल्हापूर : केंद्र सरकारचीनोकरी म्हणजे गलेलठ्ठ पगार, भरपूर सुविधा अन् समाजात एक वेगळी प्रतिष्ठा. त्यामुळे केंद्र सरकारचीनोकरी मिळवण्यासाठी अनेक जण आयुष्यभर धडपडत असतात. मात्र, केंद्र सरकारच्या सर्वच विभागांमध्ये महाराष्ट्रातील मुलांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. मार्गदर्शनाचा अभाव, इंग्रजीची भीती आणि राज्याबाहेर न जाण्याच्या मानसिकतेमुळे मराठी मुले केंद्र सरकारच्या सुखाच्या नोकरीला मुकत असल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकारच्या रेल्वे, बँकिंग, एलआयसी यासह स्टाफ सिलेक्शनच्या जागा प्रत्येक वर्षी निघतात. एसबीआय व रेल्वेमध्ये तर प्रत्येक वर्षी हजारो जागा भरल्या जातात. मात्र, या परीक्षा देण्याकडेच महाराष्ट्रातील मुले कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. परीक्षा दिली तर निवड होण्याचे प्रमाणही अगदी नगण्य आहे.
मार्गदर्शनाचा अभाव
स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांचा अभ्यासक्रम हा शाळेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाशी सुसंगत आहे. मात्र, यातील मायनस पद्धती समजून न घेतल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा घोळ होतो. विशेषत: बँकिगच्या जागा कधी सुटतात येथपासून ते अभ्यासक्रमांपर्यंत विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे या परीक्षांच्या भानगडीत विद्यार्थी पडत नाहीत. स्टाफ सिलेक्शन परीक्षांबाबत स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणारे क्लासचालकही तितकीशी जनजागृती करत नसल्याचा आक्षेप या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आहे.
परीक्षा देणारे लाखात, निवडीचे प्रमाण मात्र अल्प
काही दिवसांपूर्वी एसबीआयने क्लर्क पदासाठी देशभरातील १४ हजार जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. ५० लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामध्ये महाराष्ट्रातील अडीच लाख विद्यार्थ्यांचा समावेश होता. मात्र, यामध्ये निवडीचे प्रमाण हे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहे. हीच परिस्थिती रेल्वेच्या परीक्षांबाबत आहे. आपल्याकडे शंभर गुणांचा पेपर सोडवण्यासाठी तीन तासांचा वेळ दिला जातो. स्टाफ सिलेक्शनच्या पेपरला शंभर गुणांसाठी अवघा एक तासाचा वेळ असतो. त्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याची गती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राखता येत नसल्यामुळे या परीक्षांमध्ये विद्यार्थी यशस्वी होत नसल्याचा निष्कर्ष या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून काढला जात आहे.
स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांचा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील मुलांनी समजून घेणे गरजेचे आहे. परीक्षा देताना गती राखण्याबरोबरच या परीक्षांमधील नियमानुसार आपले गुण वजा होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागते. आपले विद्यार्थी नेमके येथेच चुकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का कमी दिसतो. - अविराज गवळी, एसबीआय शाखा प्रबंधक, गोकुळ शिरगाव.