बेने इस्रायलींचा मराठी बाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 12:36 AM2018-02-27T00:36:55+5:302018-02-27T13:50:50+5:30

बेने इस्रायली हे मराठी बोलणारे, महाराष्ट्रातील ज्यू होते. आज बेने इस्रायली समुदाय दक्षिण इस्रायलमध्ये बीरशाबा येथे स्थायिक झालेला दिसून येतो.

Marathi Bhasha Din Maharashtra culture in Israel | बेने इस्रायलींचा मराठी बाणा 

बेने इस्रायलींचा मराठी बाणा 

googlenewsNext

- ओरेन बेंजामिन

रेहोवोत (इस्रायल)- 1947 साली भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर वर्षभरात इस्रायलची स्थापना झाली. या नव्याने स्थापन झालेल्या देशात राहाण्यासाठी जगभरातून ज्यू येऊ लागले. भारतातूनही बेने इस्रायली, कोचिनी, बगदादी आणि बेने मनाशे ज्यू तिकडे स्थलांतरित झाले. यातील बेने इस्रायली हे मराठी बोलणारे, महाराष्ट्रातील ज्यू होते. आज बेने इस्रायली समुदाय दक्षिण इस्रायलमध्ये बीरशाबा येथे स्थायिक झालेला दिसून येतो. त्यानंतर रामले, लोद, अश्दोद, किर्यात गात, दिमोना, येरुखाम येथे ते मोठ्या संख्येने राहताना दिसून येतात. त्याचप्रमाणे रेहोवोत, गेदेरा, हैफा येथेही बेने इस्रायली स्थायिक झाले आहेत. 

आजच्या घडीला साधारणतः 80 हजार मराठी बेने इस्रायली येथे राहात आहेत. मात्र यांच्यापैकी नव्या पिढीतील फारच कमी लोकांना आज मराठी नीट बोलणे शक्य होते. वयाची साठी उलटलेली मंडळी मात्र व्यवस्थित मराठी बोलू शकतात आणि ते मराठीतून व्यवस्थित संवाद साधू शकतात. मात्र मायबोली हे चार महिन्यांमधून एकदा प्रसिद्ध होणारे नियतकालिक आजही मराठी बांधवांची सांस्कृतीक भूक भागविण्यासाठी प्रयत्नशील आहे. या नियतकालिकातून मराठी लेख, कविता, पाककृती प्रसिद्ध होत असतात. दोन वर्षांपूर्वी तेल अविव विद्यापीठामध्ये मराठी शिकवण्याचा वर्ग आयोजित करण्यात आला होता. या वर्गाला 26 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. 1 मेच्या दिवशी सर्व बेने इस्रायली मंडळी महाराष्ट्र दिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमतो. विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळेस आयोजित केले जातात. या कार्यक्रमांना मराठी मंडळींची उपस्थिती लक्षणीय असते.

बेने इस्रायली समुदायाच्या नव्या पिढीसाठी भारतीय जेवण आणि भारतीय पद्धतीनं होणारी लग्न या दोन विशेष आवडीच्या गोष्टी आहेत. अजूनही बेने इस्रायली समुदायातील 80 टक्के विवाह याच समूहाअंतर्गत होतात. विवाहामध्ये मेंदी, हळद हे समारंभ होतात. 

भारतीय पद्धतीच्या जेवणाची हॉटेलं आता इस्रायलमध्ये सहज सापडतात. पापड, पुरणपोळ्या, मसाले, गुलाबजाम, डिंकाचे लाडू, फरसाण, बेसनाचे लाडू, बर्फी यावर आम्ही सगळे चांगलेच तुटून पडतो. भारतात कोणीही गेलं की 'लोणचं आणलंच पाहिजे" अशी आग्रहाची "ऑर्डर" आम्ही देतोच.

इस्रायलमध्ये स्थायिक होण्यापूर्वी मी पुण्यामध्ये एका गणेश मंडळाचं अध्यक्षपदही सांभाळलं आहे. संत तुकारामांची वारी पुण्यात आली की त्यांच्यासाठी खाण्याची, पाण्याची सोय करण्यासाठी मदतही करायचो. मी आणि शर्ली पालकर असे दोघांनी गेल्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला भेट दिली असताना त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मी जितका इस्रायली आहे तितकाच भारतीय देखील आहे. भारत देशाला मी मातृभूमी आणि इस्रायलला पितृभूमी म्हणतो.

(ओरेन बेंजामिन हे मूळचे पुण्याचे असून गेली अनेक वर्षे ते इस्रायलमध्ये एल-आल या विमान कंपनीत पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत.)

Web Title: Marathi Bhasha Din Maharashtra culture in Israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.