Marathi Bhasha Din: CM Uddhav Thackeray Speech on elite status of Marathi language | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सूचक इशारा; “मराठी भाषेला अभिजात दर्जा नाकारणाऱ्यांनो...”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सूचक इशारा; “मराठी भाषेला अभिजात दर्जा नाकारणाऱ्यांनो...”

ठळक मुद्देकोरोना संकटामुळे आता आपण थेट भेटू शकत नाही. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भेटतो. याला आभासी भेट म्हणतात.मराठी भाषे प्रतीची आपली तळमळ, भावना मराठी भाषेबद्दलचे प्रेम अजिबात आभासी नाही.माझी भाषा कमकुवत नाही झाली पाहिजे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मुंबई - मराठी भाषा दिन म्हटलं की फक्त एकच दिवस मराठी भाषेचे प्रेम उचंबळून येणे चुकीचे. मराठी ही आपल्या रोमारोमात भिनलेलली भाषा आहे. माझी माती, माझी माता, माझे मातृभूमी.. माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा गौरवाचा विषय असून हा गौरव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा  मिळण्याच्या एका ध्येयाने एक होऊन पुढे जाऊ या, मग पाहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) म्हटलं आहे.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने विधानमंडळातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मराठी भाषा विभाग, मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, गेली कित्येक वर्षे आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत. केंद्रीय समितीपुढे हा विषय मान्यतेसाठी प्रलंबित आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाकारणारे जे कोणी आहेत त्यांना खडसावून सांगितले पाहिजे की, ही महाराष्ट्राची, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. ती नसती तर तुम्ही आज असता का? याचा विचार करा. माझ्या दृष्टीने मराठी भाषेला अभिजात भाषा देण्यासाठी हा एकच पुरावा पुरेसा आहे असं त्यांनी ठणकावलं.

त्याचसोबत गेली काही वर्षे आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. मुख्यमंत्री म्हणून हा माझ्यासाठी  हा दुसरा कार्यक्रम आहे. कोरोना संकटामुळे आता आपण थेट भेटू शकत नाही. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भेटतो. याला आभासी भेट म्हणतात. पण मी येथे स्पष्ट करू इच्छितो की, मराठी भाषे प्रतीची आपली तळमळ, भावना मराठी भाषेबद्दलचे प्रेम अजिबात आभासी नाही. इंग्रजी आली पाहिजे, आम्हाला दुसऱ्या भाषेचा दुस्वास करायचा नाही  पण त्यामुळे माझी भाषा कमकुवत नाही झाली पाहिजे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मला यानिमित्ताने  लोकमान्य टिळकांचे ही स्मरण होते. “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का” असं विचारून इंग्रजांना हदरवणारा अग्रलेख त्यांनी लिहिला तो ही मराठी भाषेतच. भाषा म्हणजे संस्कृती. संस्कृती म्हणजे भाषा. या दोन्ही गोष्टी एकमेकास पुरक आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले.

 जो भाषा जपतो तो संस्कृती जपतो

इतर देशाचे राष्ट्राध्यक्ष त्यांचे दुभाषी सोबत घेऊन फिरतात. आपल्या मातृभाषेत बोलणे त्यांना कमीपणाचे वाटत नाही. आपल्यातला हा न्यूनगंड जात नाही तोपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचाच नाही कुठलाच गौरव मिळणार नाही जो भाषा जपतो तो संस्कृती जपतो. या दोन्ही गोष्टी जपून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. त्या काळात मराठी भाषेत राजव्यवहार कोष तयार केला. आपल्याला आपल्या कारभारातील मराठी भाषा किती कळते? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी यावेळी विचारला(Marathi Bhasha Din)

भाषेचा अभिमान असावा- दुराभिमान नको

अनेकदा आजही आपण मराठीत बोलाताना लाजतो. आपण किती उच्चभ्रु आहोत दाखवायला बघतो आणि इंग्रजीत बोलतो. समोरच्या व्यक्तीने फाडफाड इंग्रजीत बोलले की आपण कमी पडतो. चीन, जपानमध्ये त्यांची भाषा ते ठामपणे आणि आत्मविश्वासाने बोलतात. काही ठिकाणी त्यामुळे आपल्याला अडचण येते. जगभरातील पर्यटक आपण आपल्याकडे आकर्षित करत असू तर इंग्रजी भाषेत बोलायला हरकत नाही. हे करताना भाषेचा अभिमान असावा- दुराभिमान नको असं ही मुख्यमंत्री म्हणाले. 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Marathi Bhasha Din: CM Uddhav Thackeray Speech on elite status of Marathi language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.