Maratha Reservation: शिदोरीची रसद आली अन् फलाटांवरच पंगत

By सचिन लुंगसे | Updated: September 1, 2025 11:20 IST2025-09-01T11:19:48+5:302025-09-01T11:20:26+5:30

आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या मराठा आंदोलकांची अन्नपाण्याविना आबाळ होऊ नये म्हणून राज्यभरातून अन्नधान्याची रसद मुंबईत दाखल होत आहे.

Maratha Reservation: Shidori supplies arrived and queues were on the platforms | Maratha Reservation: शिदोरीची रसद आली अन् फलाटांवरच पंगत

Maratha Reservation: शिदोरीची रसद आली अन् फलाटांवरच पंगत

सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या मराठा आंदोलकांची अन्नपाण्याविना आबाळ होऊ नये म्हणून राज्यभरातून अन्नधान्याची रसद मुंबईत दाखल होत आहे. गेल्या तीन दिवसांत पुढील कैक दिवस पुरेल इतका अन्नाचा साठा मराठा मुंबईत घेऊन आले आहेत. यात चपात्यांसोबतच भाकरी, चिवडा आणि ठेच्यासह उर्वरित अन्नपदार्थांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यभरातून मुंबईत जेवण पुरविणाऱ्या दात्यांमध्ये मुस्लिम समाजाचे बांधवांचाही समावेश आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह आझाद मैदान आणि फोर्ट परिसरात दाखल झालेल्या मराठ्यांचा ओघ रविवारीही सुरूच होता. रविवारी फोर्ट परिसरात तुरळक गर्दी असली तरी बहुतांशी लोकलमध्ये मराठा बांधव जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा देत मार्गक्रमण करत होते. दरम्यान, शुक्रवार व शनिवारची रात्री फलाटांवर काढणाऱ्या बांधवांनी जेवणाची पंगतही फलाटांवरच मांडली होती. सीएसएमटीच्या ज्या परिसरात दोरखंड बांधण्यात आले होते; त्या परिसरात रविवारी बॅरिकेटसही लावण्यात आले होते. 

टर्मिनसच्या प्रत्येक फलाटावर उतरणाऱ्या बांधवांकडून एक मराठा, लाख मराठा व पाटील...पाटील...या घोषणांचा पाऊस रविवारीही पडत होता. तर टर्मिनसचा मोकळ्या परिसरात प्रत्येक जागेवर मराठा कार्यकर्ते ठाण  मांडून होते तर थकलेले कार्यकर्ते अनेक ठिकाणी विश्रांती घेत होते. दरम्यानच्या काळात लोकलमधून उतरणारे बांधव टर्मिनसवर सुरू असलेल्या लेझीमच्या तालावर फेर धरत होते. रविवारी सकाळपासून सुरू असलेले हे शक्ती प्रदर्शन उशिरापर्यंत सुरू होते.

सीएसएमटी रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त 
दिवसा: १३ अधिकारी आणि २०० पोलिस/महिला कर्मचारी
रात्री: ६ अधिकारी आणि १३० पोलिस/महिला कर्मचारी
महिला प्रवाशांच्या मदतीसाठी महिला कोचसमोर महिला अधिकारी आणि कर्मचारी तैनात असणार आहेत.

जीवाची मुंबई
पाठिंब्यासाठी दाखल झालेल्या अनेक बांधवांनी रविवारी जुहू चौपाटी गाठली. गिरगाव आणि मरिन ड्राइव्हपेक्षाही कार्यकर्त्यांना जुहू चौपाटीची भुरळ अधिक असल्याचे चित्र होते. केवळ चौपाटीच नाही तर गिरगाव, परळमधील श्रीगणेश दर्शनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी होत असल्याचे चित्र होते.

मुस्लिम कार्यकर्तेही मदतीला
मराठा कार्यकर्ता प्रदीप पन्हाळकर यांनी सांगितले, गावावरून मुंबईत दाखल झालेल्या बांधवांना मदत म्हणून आम्ही सुगाव-भोसे येथून शिदोरी पाठविली.  मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मुबारक मुलाणी यांच्यासारख्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिदोरीसाठी मदत केली. १ हजार भाकऱ्या, चिवडा, १०० किलोच्या चपत्या आणि ४० किलो ठेचासह उर्वरित अन्नपदार्थांचा समावेश असल्याचे प्रदीप यांनी सांगितले.

Web Title: Maratha Reservation: Shidori supplies arrived and queues were on the platforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.