खलील गिरकरलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: आरक्षणाच्या मुद्द्यावर शुक्रवारी सुरू झालेले मराठा आंदोलन शनिवारीही राहिल्याने मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचलेल्या आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरच (सीएसएमटी) आश्रय घेतला आहे. आंदोलकांसाठी स्टेशनचा प्लॅटफॉर्मच जेवणाचे आणि झोपण्याचे ठिकाण झाले आहे. परिणामी प्रवासी सुरक्षा आणि स्टेशनवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.
सीएसएमटीमध्ये पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी आंदोलकांची गर्दी कमी झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. पाऊस आला की स्टेशनमध्ये आणि पाऊस गेल्यावर पुन्हा रस्त्यांवर अशी आंदोलकांची वर्दळ सुरू होती. सब-वे, खाऊगल्ली आणि फोर्ट परिसरातील दुकाने उघडण्यात आली होती.
सब-वेसह वाहनांमध्ये आंदोलकांची रात्रआंदोलकांनी सीएसएमटी येथील सब-वेमध्ये, तर काहींनी त्यांच्या वाहनातच रात्र काढली. जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी आंदोलकांनी विश्रांती घेतली. तर काही आंदोलकांनी मुंबई व महानगर परिसरात असलेल्या त्यांच्या नातेवाइकांकडे, मित्रांकडे आसरा घेतला.
महिला आंदोलकांची माेठ्या प्रमाणात गैरसोय महिलांसाठीही काहीही सोय केलेली नाही. आझाद मैदानाबाहेरची लाईटही घालवली होती. सरकारला काहीही पडले नाही. त्यांना वाटले पावसामुळे आम्ही दुभंगू मात्र, आम्ही न्याय मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया धाराशिवच्या महिला आंदोलक अश्विनी मगर यांनी व्यक्त केली.